रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीचे पावसामुळे नुकसान, पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दया-सुहास खंडागळे
गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी*
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात पर्यायाने कोकणात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे येथील भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.परिणामी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना इमेल द्वारे पत्र पाठवून सुहास खंडागळे यांनी ही मागणी केली असून भात शेती घेणारा कोकणातील आमचा शेतकरी परतीच्या पावसामुळे आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.कष्टकरी वर्गाची वर्षाची मेहनत पावसामुळे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे भात कापण्याच्या वेळेला च पावसाचे आगमन झाल्याने आमच्या शेतकरी बांधवांची शेती बुडाली आहे असे गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी या पत्रात म्हटले आहे.जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्याचे प्रमुख म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीचे झालेले नुकसान याबाबत राज्य शासनाला तातडीने कळवून नागरिकांच्या शेतीचे पंचनामे करावेत व या भागात जास्त प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असल्यास ओला दुष्काळ जाहीर करून आमच्या शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई मिळण्यासाठीशासन दरबारी तातडीने पाठपुरावा करावा अशी मागणी सुहास खंडागळे यांनी केली आहे.
भातशेती हे रत्नागिरी जिल्ह्यात शेतकरी वर्गाचे महत्त्वाचे पीक असल्याने या शेतीवर अवलंबून असणारा मोठा वर्ग येथे आहे,या वर्गाला तातडीने दिलासा मिळणे आवश्यक असल्याचे खंडागळे यांनी या पत्रात म्हटले आहे.