
रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वारावर असलेल्या खेडमध्ये ना. उदय सामंत यांचे जल्लोषात स्वागत
खेड : ना. उदय सामंत यांचे दि. 14 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खेडमध्ये आ.योगेश कदम व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. रविवारी दि. 14 रोजी सायंकाळी 3वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी खेड तालुक्यातील कशेडी घाट येथे शेकडो कार्यकर्ते पोहोचले होते. वाहनांच्या ताफ्यात ना.उदय सामंत हे भरणेनाका येथे श्री देवी काळकाई मंदिरात पोहोचले. त्यांनी श्री काळकाई देवीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर खेड शहरातील तीनबत्ती नाका येथे आ.योगेश कदम यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ना.उदय सामंत यांचे स्वागत केले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी ना.सामंत यांचे औक्षण केले. त्यानंतर ना. सामंत यांनी योगिता दंत महाविद्यालय येथे पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ना.सामंत म्हणाले, शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आ. विनायक मेटे यांचे निधन झाल्याने मराठा समाजाचे व महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. या दुःखाच्या प्रसंगामुळे आम्ही सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून आ.मेटे यांनी श्रध्दांजली अर्पण करत आहोत.