एटीएम कार्डची अदलाबदल करून लाखो रुपयांचा गंडा घालून धुमाकुळ घालणार्या टोळीच्या मुसक्या आवळल्या
गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील अनेक शहरात एटीएम कार्डची अदलाबदल करून खातेदारांचे लाखो रुपये हडप करणार्या सराईत टोळीला आज हातखंबा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांच्या पथकाने अटक केली. ही टोळी रत्नागिरी शहरात अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी येत असल्याची खबर अन्वेषण विभागाला मिळाली होती. ही टोळी हातखंबा येथे आली असता पोलिसांच्या पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या.
या टोळीतील आरोपींची नावे सागर देवीदास आंबोरे (रा. उल्हासनगर), महेश धनगर (रा. विठ्ठलवाडी,ठाणे), गणेश लोडते (रा. उल्हासनगर), रोहित शर्मा (रा. उल्हासनगर), विकी वानखेडे (रा. विठ्ठलवाडी, ठाणे) यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. या टोळीकडे चौकशी केली असता या टोळीने महाराष्ट्र राज्यातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे तसेच गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या टोळीकडून २ लाख ४३ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम, मोबाईल हॅण्डसेट, वेगवेगळ्या बँकांची एटीएम कार्ड तसेच गुन्ह्याच्या कामी वापरलेली स्वीप्टकार असा ५ लाख २३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शिरीष सासणे, उपनिरीक्षक विकास चव्हाण, संदीप कोळंबेकर, सुभाष भागणे, नितीन डोमणे, विजय आंबेकर, सागर साळवी, दत्ता कांबळे तसेच सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष माने, शांताराम झोरे, राजेश भुजबळराव, प्रशांत बोरकर, अरूण चाळके, अमोल भोसले यांनी पार पाडली.
www.konkantoday.com