
*राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रूक येथील धरणावरून राबविण्यात येणार्या नळपाणी योजने संदर्भात तक्रारी*
____राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रूक येथील धरणावरून राबविण्यात येणार्या नळपाणी योजने संदर्भात तक्रारी वाढत असतानाही ही योजना राबविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. धरण प्रकल्पग्रस्त संदर्भात दोन महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी दालनात झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने पांगरे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करत गावामध्ये या योजनेचे कोणतेही काम न करू देण्याचा निर्णय काही ग्रामस्थांमधून घेतला जात असल्याचे वृत्त आहे. यामुळे या योजनेचे भवितव्य अंधारमय होत चालले आहे.जलजीवन मिशन अंतर्गत पांगरे चिंचवाडी धरणातून परिसरातील १३ गावांसाठी नळपाणी योजना तीन वर्षापूर्वी मंजूर करण्यात आली. मात्र अद्यापही काम मार्गी लागलेले नाही. ही योजना राबविताना मुळातच ग्रामपंचायत वा ग्रामस्थांना विश्वासात घेतलेेले नाही, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे प्रत्येक वाडी वस्तीवर सध्या शासन व खाजगी नळपाणी योजना कार्यरत असताना या योजनेची काहीही गरज नाही. ही नळपाणी योजना राबविताना ५ टक्के लोकवर्गणी भरण्याची अट घालण्यात आली आहे. गरज नसतानाही ही योजना राबविली जात असल्याने ५ टक्के लोकवर्गणी ग्रामस्थांच्या माथी मारली जात आहेत.www.konkantoday.com