चिरंजीवाच्या विजयासाठी रामदास कदम मतदारसंघात तळ ठोकून!
शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे स्टार प्रचारक व शिवसेनेचे नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिरंजीव योगेश कदम निवडणूक लढवीत असल्याने याच मतदारसंघात तळ ठोकून बसले आहेत. राज्यात दापोली विधानसभा मतदारसंघातील ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून रामदास कदम यांनी मंत्रालयातील आपले वजन वापरून दापोली विधानसभा मतदारसंघात बाराशे कोटी रुपयांची विकास कामे गेल्या चार वर्षात मंजूर करून आणली आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांचा मुलगा योगेश कदम याला मतदारानी निवडून द्यावे, अशी त्यांची साधी अपेक्षा आहे.परंतु राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान आमदार संजय कदम यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.शिवसेना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाही.त्यामुळे कदम हे स्वतः जातीने मतदारसंघात तळ ठोकून आहेत.
www.konkantoday.com