
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला हव्यात दोन जागा,19 ला होणार युतीची घोषणा
रत्नागिरी-भाजप-शिवसेनेच्या युतीची घोषणा 19 होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गुहागरवर भाजपचा ठामपणे दावा केला आहे. तसेच रत्नागिरी व राजापूर या दोन जागांचीही मागणी भाजपने केली आहे. यातील किमान 2 जागा नक्की मिळाव्यात, अशी मागणी आहे. यासंदर्भात 23 सप्टेंबरला मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
युतीच्या नियमानुसार विजयी उमेदवार असल्यास किंवा दुसर्या क्रमांकाची मते युतीच्या उमेदवारास असल्यास ती जागा त्या पक्षाला सोडण्यात येते. गुहागरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भास्कर जाधव विजयी झाले व आता ते शिवसेनेत आहेत. दुसर्या क्रमांकाची मते भाजपच्या डॉ. विनय नातू यांना असल्याने या जागेवर आम्ही ठामपणे दावा केला आहे. शिवाय रत्नागिरी व राजापूरच्या जागांचीही मागणी केली असून जिल्ह्यात किमान 2 जागा आम्हाला मिळाव्यात. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री व ठाकरे घेतील, असे लाड यांनी स्पष्ट केले.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम योग्यपणे करणार्या ठेकेदारांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्यातील एक ठेकेदार बदलला असून दुसर्याला बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील वर्षीपर्यंत महामार्ग पूर्ण होईल. तसेच परशुराम देवस्थानच्या जमिनीबाबतचा वाद मिटला आहे. त्यामुळे आता काम वेगाने होईल. 2009 ते 2014 या काळात काँग्रेस सरकारने या रस्त्याकरिता कोणत्याही परवानग्या घेतल्या नाहीत. परंतु मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरींच्या पुढाकाराने हा मार्ग होत आहे, असेही लाड यांनी स्पष्ट केले.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम मे ते डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या मार्गाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करणार असल्याचे आमदार लाड यांनी सांगितले.
www.konkantoday.com