गड कील्ल्यांऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या,राज्य सरकारवर राज ठाकरे यांची टीका
कल्याण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या गड-किल्ले भाड्याने देण्याच्या धोरणावर महाराष्ट्रभरातून टीका होत आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. सरकारला उत्पन्नच मिळवायचे असेल, तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत, अशा शब्दात राज ठाकरेंनी गड-किल्ले धोरणाचा समाचार घेतला.
राज ठाकरे यांनी सरकारचा हा निर्णय केवळ मूर्खपणाचा असल्याचे म्हणत सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले, “महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास आहे. मात्र सरकारला याचं काहीच देणंघेणं नाही. जर सरकारला उत्पन्न हवे असेल, तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत. त्यातून त्यांनी पैसे मिळवावेत. भाजप मशीनच्या मदतीने निवडून येत आहे. त्यामुळे ते लोकांना विचारातही घेत नाहीत.”
राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठींना सुरुवात केली. आज ते डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार होते. मात्र, बैठकीसाठी येताना राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला. त्यामुळे आजची बैठक रद्द करण्यात आली आहे.
राज ठाकरे डोंबिवलीत येण्यापूर्वी एमएसआरडीसीने कल्याण शीळ रोडवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले. मात्र, तरीही राज ठाकरे यांना कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्ड्यांचा फटका बसला. राज ठाकरेंचा ताफा काही काळ काटई नाक्याजवळ ट्रॅफिकमध्ये अडकला. यानंतर राज ठाकरेंनी मनसेचे नेते राजू पाटील यांच्या घरी जाऊन रेम्बो या श्वानाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राजू पाटील यांच्या भावाच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.
राज ठाकरेंची आज रद्द झालेली बैठक उद्या सकाळी १o वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांनी संवाद साधतील. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवतील.