राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नियुक्ती करावी– जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह


*रत्नागिरी, दि. 30 (जिमाका) : सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची लवकरात लवकर नियुक्ती करण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.
प्रारुप मतदार यादी व पदवीधर मतदार संघ मतदार यादीबाबत सर्व राजकीय पक्षांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, नायब तहसीलदार दीपक चव्हाण, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी चे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, 263- दापोली विधानसभा मतदार संघात 371, 264 – गुहागरमध्ये 322, 265- चिपळूणमध्ये 336, 266- रत्नागिरीमध्ये 345 आणि 267- राजापूरयध्ये 341 अशी एकूण 1715 अंतिम मतदान केंद्रांची संख्या आहे. एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द केली आहे. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकरण्यात येतील. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी शनिवार 4 नोव्हेंबर, रविवार 5 नोव्हेंबर, शनिवार 25 नोव्हेंबर व रविवार 26 नोव्हेंबर निश्चित केलेले आहेत. दावे व हरकती निकाली काढणे – 26 डिसेंबर, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे – 5 जानेवारी 2024 असा पुनरीक्षण कार्यक्रम आहे.
पदवीधर मतदार नोंदणीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. मतदारांची पात्रता 30 ऑक्टोबर 2020 पूर्वी पदवी/पदवीत्तर पूर्ण झालेली असावी. मतदार पदवीधर मतदार संघातील रहिवासी असावा. मतदाराची पदवी किंवा पदवीत्तर शिक्षण भारतातील कोणत्याही विद्यापीठाचे ग्राह्य मानले जाईल. अर्जासोबत राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली पदवी अथवा पदविका प्रमाणपत्राची अथवा गुणपत्रक प्रत जोडणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button