मुसळधार पावसातही लाडक्या बाप्पाला उत्साहात निरोप
कोकणवासीयांच्या लाडक्या गणपती बाप्पाला आज मोठ्या उत्साहात वाजत गाजत निरोप देण्यात आला.गणपती बाप्पांच्या आगमना पासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून आजही निरोपाच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली नाही.परंतु मुसळधार पावसातही गणेशभक्तांचा उत्साह कमी झाला नाही. रत्नागिरीतील मांडवी किनारी व भाटये किनारी आज वाजत गाजत घरगुती व काही सार्वजनिक गणरायांना निरोप देण्यात आले. रत्नागिरी शहरात सकाळपासून पावसाने जोर केला होता सायंकाळी काही वेळ पावसाचा जोर कमी झाला होता. यामुळे अनेक गणेशभक्तांनी गाडय़ांमधून गणरायाला नेऊन त्यांना निरोप दिला. मात्र दरवर्षी प्रमाणे अनेक गणरायांच्या मिरवणुका भर पावसातही उत्साहात काढण्यात आल्या. पावसाची पर्वा न करता गणेश भक्त मोठ्या उत्साहाने सामील झाले होते यामुळे मांडवी किनारा व भाटय़े किनारा गणेश भक्तांनी फुलून गेला होता.मांडवी येथील परंपरागत सोळकोबा व बाळकोबा या दोन मोठ्या गणेश मूर्तींचे आज विसर्जन होते ते पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. आपल्या लाडक्या गणपती सणासाठी अनेक चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. ते आता परतीच्या प्रवासाला लागणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील १लाख १५ हजार ५५३ घरगुती मुर्तीचे आज विसर्जन होत आहे.याशिवाय जिल्ह्यातील चौदा सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात आहे. भर पावसातही दरवर्षीच्या उत्साहात वाजत गाजत मिरवणुका मांडवी परिसरात येत होत्या.
www.konkantoday.com