रिफायनरी प्रकल्प येण्यासाठी समर्थकांची वातावरण निर्मिती
रत्नागिरी:नाणार येथील रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी रिफायनरी समर्थकांनी आता गावोगावी फलक उभारून वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरात व्हावा यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठान समितीने पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी व राजापुर परिसरातील प्रकल्प समर्थकांनी रत्नागिरी शहरात भव्य मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले होते. या ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे या परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास होवून रोजगार मिळेल असे समर्थकांचे म्हणणे होते. त्यातच या परिसरात काम करणार्या कोकण जनकल्याण प्रतिष्ठान समितीने प्रकल्पाच्या समर्थनार्थ वातावरण निर्मिती व्हावी यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये स्थानिक शेतकर्यांच्या गाठीभेटी घेवून प्रकल्पाची सकारात्मक बाजू त्यांना पटवून देणे व पाठिंबा देणार्या शेतकर्यांना एकत्रित आणणे आदी कामे त्यांनी सुरू केली होती. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे पंढरीनाथ आंबेरकर व अविनाश महाजन हे गावागावात जावून प्रकल्प होण्याच्या दृष्टीने बाजू मांडत आहेत. यासाठी त्यांनी प्रकल्प समर्थनार्थ जनसंपर्क कार्यालयही सुरू केले होते. गणपती सणासाठी मुंबईतील चाकरमानी मोठ्या प्रमाणात आपल्या गावात येत असल्याने त्यांच्यातही प्रकल्पाची सकारात्मक बाजू पोचावी यासाठी या परिसरातील गावात गणेश भक्तांच्या स्वागताचे बोर्डही अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. याशिवाय काही गणपतीच्या मंडपातही स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. एकूणच हा प्रकल्प होण्याच्या दृष्टीने प्रकल्प समर्थक सध्या जागृतीचे काम करीत आहेत.