गणपती उत्सवासाठी पोलीस यंत्रणेकडून महामार्गावर मदत केंद्र
रत्नागिरी:येत्या काही दिवसात सुरू होणार्या गणपती उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी खाजगी वाहनाने कोकणाकडे येणार असून या चाकरमान्यांचा प्रवास विनाअपघात व्हावा व त्यांना आवश्यक असल्यास मदत मिळावी या हेतूने रत्नागिरीत पोलिसांनी विविध ठिकाणी मदत पथके उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेडपासून राजापूरपर्यंतच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत १५ मदत केंद्रे आणि चार चेकपोस्ट उभारण्यात येणार असून ३० ऑगस्ट ते १३ सप्टेंबरपर्यंत ही केंद्रे कार्यान्वित होणार आहेत. याशिवाय महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी व खाजगी ऍम्ब्युलन्स, वैद्यकीय पथके तसेच रस्त्याची दिशा दाखविणारे किंवा दुरूस्तीचे काम दाखविणारे फलक लावण्यात येणार आहेत. या मदत केंद्रात चाकरमान्यांना प्रवासाचा थकवा घालविण्यासाठी चहापानाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com