माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या झंझावात या आत्मचरित्राचे खा. शरदरावजी पवार यांच्या हस्ते प्रकाशन

0
326

राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायणराव राणे यांचे आत्मकथन असलेल्या झंझावात या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदरावजी पवार यांचे हस्ते तर No Holds Barred या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षाचा कालावधी मिळाला असता तर एक दूरदृष्टीचा उत्तम प्रशासक महाराष्ट्राला मिळाला असता. पवार यांनी यावेळी राणे यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला. राणे यांचा स्वभाव अन्याय सहन न करण्याचा असल्याने त्यांची घालमेल झाल्यावर त्यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर कॉंग्रेस की राष्ट्रवादीमध्ये जावे या द्विधा मनस्थितीत त्यांनी दोन चिठ्ठ्या बनवल्या. त्यातील एक चिठ्ठी उचलली ही चिठ्ठी कॉंग्रेसची होती आता ही चूक होती की घोडचूक हे त्यांनीच ठरवावे अशी मिश्किल टीप्पणही पवार यांनी केली. राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात आयुष्यातील अनेक घटना मोकळ्यापणाने मांडल्या आहेत. एक सामान्य कुटुंबातील गिरणी कामगाराचा मुलगा यशस्वी होवू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. ६४-६५ सालात बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावरून राज्याचे लक्ष वेधले आणि तरूणांना गोळा केले. यामध्ये जीवाला जीव देणार्‍या तरूणांमध्ये राणे होते. बाळासाहेबांच्या आयुष्यातील चांगल्या, वाईट प्रसंगात ते त्यांच्या मागे सावलीसारखे राहिले. आपल्या अभ्यासू वृत्तीने आणि कर्तृत्वाने सामान्य घरातून आलेले राणे हे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. राणे यांनी कोकणसारख्या भागात कृषि अभियांत्रिकीपासून, मेडिकल कॉलेजपर्यंत शिक्षणाची गंगा आणली ही त्यांची दूरदृष्टी आहे.यावेळी बोलताना केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नारायण राणे यांची स्तुती केली. राणे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आपण शिवसेना सोडू नका असे सांगितले होते. त्यावेळी राणे यांच्या डोळ्यात अश्रू होते. मी हा निर्णय आनंदाने घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. राणे यांचेकडे चांगले व्यवस्थापन कौशल्य होते. त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला नसता तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते असेही गडकरी यांनी सांगितले.
राणे यांच्या पुस्तकात फक्त २५ टक्के इतिहास आहे. राणेंच्या भूतकाळातील ७५ टक्के इतिहास हा या पुस्तकात छापण्यात आलेला नाही असेही त्यांनी सांगितले. राणे यांचा स्वभाव आणि माझा स्वभाव जवळपास सारखा आहे. आम्ही दोघेही स्ट्रेटफॉरवर्ड आहोत. दोघांच्याही मनात कोणताही कपटीपणा नसतो असे सांगितले.
यावेळी बोलताना नारायणराव राणे म्हणाले, मी माझ्या आयुष्यात सर्वात जास्त प्रेम कोणावर केले असेल तर ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर. आज माझे जे कौतुक होत आहे त्याचे श्रेय बाळासाहेबांनाच आहे. मी शिवसेनेत असताना कधीही पदे मागितली नाहीत. मात्र बाळासाहेबांनी आपल्याला शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पदे दिली, याबद्दल मी त्यांचा आदर व कृतज्ञता व्यक्त करतो. आजचा पुस्तक प्रकाशनाचा क्षण माझ्यासाठी सुवर्णअक्षरात नोंदवून ठेवण्यासारखा आहे. या पुस्तकाला पवार साहेबांनी प्रस्तावना दिली आहे. माझी प्रतिमा उंचावण्यासाठी ही प्रस्तावना महत्वाचे काम करेल असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री विनोद तावडे, खा. सुनिल तटकरे, आ. कालिदास कोळंबकर, मधुकर भावे, सौ. निलमताई राणे, माजी खा. निलेश राणे व आ. नितेश राणे उपस्थित होते.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here