चिपळूण-दादर पॅसेंजर सुरू करण्याची खा. सुनिल तटकरे यांच्याकडे मागणी
रत्नागिरी :कोकण रेल्वे महामार्गावर महत्वाचे स्थानक असलेल्या चिपळूण स्थानकात अनेक एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत. चिपळूण परिसरात लोटे परशुराम व अन्य भागात मोठ्या औद्योगिक वसाहती असल्याने चिपळूण स्थानकाला महत्व आहे परंतु या ठिकाणाहून जाणार्या रेल्वे प्रवाशांना रेल्वेने प्रवास करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी चिपळूण-दादर अशी पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची अनेक वर्षापासूनची चिपळूणकरांची मागणी आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या कोकणकन्या व मांडवी एक्स्प्रेस या गाड्या अत्याधुनिक बनविताना त्यामधील जनरलचे दोन डबे कमी करण्यात आले आहेत. हे डबे सुरू करण्याचे आश्वासन देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात हे डबे अजूनही जोडण्यात आलेले नाहीत. चिपळूण येथून मुंबईला जाण्यासाठी व येण्यासाठी मोठा प्रवासी वर्ग असतो. या डब्यांच्या कमतरतेमुळे त्यांची गैरसोय होत आहे. यासाठी ही पॅसेंजर रेल्वे सुरू करावी अशी मागणी खा. सुनिल तटकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
www.konkantoday.com