रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे मोठे नुकसान होवून त्याचा फटका अनेक कुटुंबाना बसला आहे. या कुटुंबाना शिवसेनेच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आ. उदय सामंत यांनी दिली आहे.
रत्नागिरी शहरात मांडवी येथे भव्य दहिहंडीचा उत्सव आ. सामंत यांच्या माध्यमातून साजरा केला जातो. या वर्षी पुरपरिस्थितीचा व बाधित कुटुंबांचा विचार करून हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खर्च होणारे पाच-सहा लाख रुपये आता पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहेत. याशिवाय मारूती मंदिर येथे होणारा रत्नागिरीचा राजाचा उत्सव देखील साधेपणाने साजरा करण्यात येणार असून त्यातून वाचलेली रक्कम पुरग्रस्तांना दिली जाणार आहे. दोन दिवसात या रत्नागिरीच्या राजाच्यावतीने १ लिटरच्या पाण्याच्या बॉटल कोल्हापूर येथे पाठविण्यात येणार आहेत. तसेच तालुक्यात जी ३०२ कुटुंबे जास्त बाधित झाली आहेत त्यांना शिवसेनेतर्फे प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदतही करण्यात येणार आहे. पुरग्रस्त परिस्थिती आटोपल्यानंतर त्यांना आवश्यक असलेली मदतही शिवसेना देणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात जी परिस्थिती ओढवली आहे त्याबाबतही रत्नागिरी जिल्हा शिवसेनेच्यावतीने मदत करण्यात येणार आहे. आपल्या माध्यमातून मुंबई येथून पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचा ट्रक पाठविण्यात आला आहे. याशिवाय तेथील पुरग्रस्त परिस्थिती आटोपल्यानंतर त्या ठिकाणी बाधित कुटुंबांना संसारोपयोगी भांडी देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे. पुराचे पाणी ओसरले तरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साथी येण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेषतः महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लिलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांची एक टीम महिलांच्या तपासणीसाठी पाठविली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here