
चंद्रकांत बाईत विद्यालयाच्या विद्यार्थिनी कराटे स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
रत्नागिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेमध्ये आबलोली (ता. गुहागर) येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी पूजा अरुण आंब्रे हिने १४ वर्षांखालील वयोगटात, तर समृद्धी सुधाकर भोजने हिने १७ वर्षांखालील वयोगटात कराटे स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
पूजा आंब्रे व समृद्धी भोजने यांची जिल्हास्तरावर स्पर्धा झाली असून, लवकरच विभागस्तरावर स्पर्धा होईल. त्यानंतर त्या राज्यस्तरावर स्पर्धेसाठी पात्र होतील. या दोन्हीही विद्यार्थिनींचे प्राध्यापक डी. डी. गिरी, लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष सचिन बाईत, चंद्रकला फाउंडेशनच्या सचिव सौ. स्नेहल बाईत यांच्यासह गुहागर तालुक्यातील विविध सामाजिक, धार्मिक संघटना यांच्यावतीने या विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.




