चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचे चतुरस्त्र खेळाडू डॉक्टर पानवलकर तथा नाना! एक श्रद्धांजली ॲडव्होकेट धनंजय जगन्नाथ भावे रत्नागिरी

0
1082

रत्नागिरीमध्ये सन 1973मध्ये व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावलो आणि मी प्रथमच बॅडमिंटन खेळ सुरू केला. बॅडमिंटनच्या त्यावेळच्या स्पर्धा पाहून डॉक्टर पानवलकर म्हणजेच नाना यांचा खरा परिचय झाला. विष्णू गोगटे, मदन चव्हाण, अप्पा वणजू विश्वास मलुष्टे , श्रीमती प्रभाताई केळकर वगैरे प्रतिथयश खेळाडू त्यावेळी फुल फॉर्मात होते. पण नानांच्या खेळाने या खेळाचे वेगळेपण लक्षात यायचे .डॉक्टर म्हणून लहानपणी नानांचे नाव ऐकून होतो, परंतु आमचे ते फॅमिली डॉक्टर नसल्याने तसा विशेष परिचय नव्हता. पण बाजारात जाताना विहार हॉटेल च्या समोरच्या गल्लीमध्ये नानांच्या दवाखान्यामध्ये अफाट गर्दी ही दिसत असेल तेवढेच लहानपणी पाहीले होते.

वरच्या आळीतील कै. भगवान अण्णा जोशींच्या क्ले कोर्टवर बॅडमिंटन खेळाचा मी श्रीगणेशा केला. त्यानंतर खेळात बऱ्यापैकी सुधारणा झाल्यानंतर फाटक हायस्कूलच्या पुरुषोत्तम स्मृती हॉलमध्ये असलेल्या क्लब मध्ये जॉईन झालो आणि त्यानंतर या खेळामधील रत्नागिरी मधील नामवंत खेळाडूंचा जवळून परिचय झाला. त्यातच तेथे होणाऱ्या वार्षिक स्पर्धांमध्ये लकी डबल इव्हेंटमध्ये भाग घेतला. त्यावेळी मला आठवते नाना आणि त्यांचे पार्टनर विरुद्ध मी आणि माझा सीनियर पार्टनर विश्वास मलुष्टे यांचा अंतिम सामना झाला. यावेळेच्या खेळांमधून नानांनी आणि त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांनी मला जयस्तंभ येथील महिला मंडळ हॉल मध्ये खेळत असलेल्या क्लब मध्ये जॉईन करून घेतले आणि तेथूनच नानांच्या खेळाचा खरा परिचय होऊ लागला. त्यानिमित्ताने नानांचा वेळोवेळी जवळून परिचय झाला आणि तो स्नेह आमचे दरम्यानच्या वेळोवेळीच्या लुटूपुटूच्या वादविवादाने अधिकाधिक वृद्धिंगतही झाला आणि तो आजपर्यंत नानांनी मोठेपणाने कायम ठेवला होता याची आज प्रकर्षाने जाणीव होत आहे.

नानांच्या बॅडमिंटन खेळाविषयी किती लिहाल, किती ऐकाल, किती पहाल, किती सांगाल ते खरे तर कमीच पडेल! हा माणूस वयाची पंचाहत्तरी उलटून गेली तरी त्याच दमाने बॅडमिंटन खेळत राहिला. त्यांचा फिटनेस, त्यांचा आहार, त्यांचा निश्चय, त्यांची श्रद्धा, कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय खेचून आणायची जिद्द या आम्ही नुसत्या पाहायच्या गोष्टी आहेत. त्यांचा आदर्श ठेवा असे सांगण्याची सुद्धा आमची पात्रता नाही असे मला वाटते. नाना बॅडमिंटन हा खेळ कोठे शिकले माहीत नाही, पण त्यांची शैली आत्मसात करणे कठीण आहे हे नक्कीच. बॅडमिंटन या खेळातील सर्व फटक्यांचा वापर आजही ते तितकेच लीलया करू शकत होते हे विशेष! स्मॅश, बॅक लॉबीतून नेट जवळ नजाकतीने शटल टाकणे हे त्यांचे कसब होते. नाना साइड लॉबी मधून बॅक हँड सर्विस करत. ती आक्षेपार्ह असली तरी त्याची नक्कल करायला आम्ही सर्वजण बघायचो. पण ती नाना-सर्व्हिस करणे कोणालाही इतक्या सहजतेने जमले नाही. नानांनी अशी सर्विस केली की पलीकडे आम्ही कोणी असलो तर सरळ शटल हातात घेऊन नानांना रोखायचे एवढाच मार्ग आम्हाला शिल्लक असायचा. खेळताना वातावरण गमतीजमतीच्या चर्चांचे आणि क्वचित प्रसंगी वाद-विवादांचे असले तरी एनर्जेटिक असायचे. एकदा सकाळी खेळ झाला की दिवस कसा मजेत जातो ते कळायचे नाही. नानांनी या खेळांमध्ये विविध बक्षिसे मिळविली. परदेशातही बक्षिसे मिळविली ती त्यांच्या खेळातील नितांत श्रद्धेवर, आत्मविश्वासावर आणि निर्विवाद वर्चस्वावरच! त्यांच्या आजवरच्या यशाचे सर्वस्वी श्रेय त्यांचेच आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. रत्नागिरी मधील विविध वयोगटातील खेळाडूंनी त्यांचा खेळ चालू ठेवला, एवढाच म्हटला तर त्या खेळाडूंचा त्यांच्या यशा मधील वाटा. अनेक खेळाडूंमुळे रत्नागिरीमधील बॅडमिंटन हा खेळ जिवंत राहिला परंतु हा खेळ नानांमुळे नावारूपाला आला असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही. आजही बॅडमिंटन म्हटले तर ज्येष्ठ खेळाडूंमध्ये नानांचे नाव न विसरता घेतले जात होते याबद्दल वादच नाही. कमतरता म्हणायची झाली तर त्यांना त्यांच्या सारखा पूर्ण खेळाडू तयार करता आला नाही आणि संघटनेचे माध्यमातून या खेळाचा अधिकाधिक विकास अपेक्षेप्रमाणे करणे जमले नाही इतकेच. अर्थात रुग्णसेवेच्या जबाबदारी मधून या कामासाठी वेळ काढणे हे त्यांना शक्य होणारे नव्हते हेही तितकेच खरे आहे. बॅडमिंटन या खेळातील त्यांच्या व्यक्तिगत वर्चस्वी खेळाकडे पाहता ही त्रुटी लपून जाते असेही मला वाटते. परदेशामध्ये सहकुटुंब खेळून नानांनी अनेक बक्षिसे मिळविली आणि ज्येष्ठांच्या बॅडमिंटन खेळामध्ये जागतिक नकाशावर आणले हे विसरता येणार नाही.

बॅडमिंटन सोबतच नाना अत्यंत चांगल्या प्रकारे टेनिस सही खेळायचे. टेनिस मध्ये देखील तोच आत्मविश्वास, तेच वर्चस्व नानांजवळ होते. टेनिस कोर्टवरही नानांबरोबर चकमकीने खेळण्यात जो आनंद होता त्याचे वर्णन करता येणारे नाही. तेथेही त्यांची अगदी अलीकडेपर्यंत ची आक्रमकता वाखाणण्यासारखी होती त्याचाही अनुभव अनेकांनी घेतला आहे.

बॅडमिंटन खेळामधील साम्राज्य वगळता नानांचा आणखीही परिचय सर्वांना असणे गरजेचे आहे. अनेक वर्षे ते रिमांड होम या संस्थेचे आस्थेने काम करीत राहिले हे काम त्यांना कर असे कोणी सांगितले नव्हते पण त्यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून ते काम स्वेच्छेने स्वीकारले आणि त्यांनी ही जबाबदारी व्यवसाय सांभाळून जीवनभर सांभाळली. रत्नागिरी चे नगरसेवक पदही त्यांना त्यांच्या जनमानसातील मान्यतेमुळे मिळाले होते. मला आठवतं त्याप्रमाणे त्यांनी उपनगराध्यक्ष पदही भूषविले होते. या क्षेत्रात सायकलचे पेडल सहजगत्या उलटे फिरवणे त्यांना शक्य होणारे नव्हते ते जमलं हि नसते ,त्यांच्या चहात्यांना ते आवडलेही नसते आणि आता नगर परिषदे मधील ज्येष्ठांच्या आणि श्रेष्ठांच्या मध्ये काम करणे त्यांना जमलेही नसते .त्यामुळेच नगरसेवक पदाचा विषय त्यांनी एकदाच केला पण त्यांनी समाजकारण मात्र बाजूला ठेवले नाही. सुरुवातीला रत्नागिरी जिल्हा वाचनालयामध्ये डॉक्टर शिंदे,डॉक्टर केळकर आणि नेरुरकर यांच्यासोबत वाचनालयासाठी त्यांनी काम केलेले आहे .त्यानंतरही मारुती मंदिर येथील वाचनालयाच्या जडणघडणीमध्ये नानांनी खूप लक्ष दिलेले आहे. वेळात वेळ काढून नाना वाचनालयामध्ये जाऊन प्रत्यक्ष चौकशीही करीत असत आणि मार्गदर्शनही करीत असत.

बाग बगीचा फुले झाडे आणि त्यातही गुलाब हा नानांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. रोटरीच्या म्हणजे क्लबच्या माध्यमातून सभासदांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये गुलाबा विषयी माहिती देऊन त्यांनी रत्नागिरीमधील गुलाब पुष्प प्रदर्शनाचा उपक्रम सहकार्‍यांसोबत सुरू केला. आजही त्यातून निर्माण झालेल्या रुचीने तो सुरूच आहे. नाना एवढ्यावरच थांबले नाहीत,’ पुष्प सम्राट गुलाब’ या पुस्तकाचे त्यांनी अत्यंत माहितीपूर्वक आणि मेहनतीने लिखाण केले आणि ते प्रसिद्धही केले. त्यातील माहिती नानांच्या गुलाब विषयक अभ्यासाची परिपूर्णता दाखविते. गेले काही दिवसांच्या आजारपणाचा काळ वगळता जीवनाच्या अंतिम प्रवासापर्यंत ते स्वतःच्या बागेमध्ये वेळात वेळ काढून नवनवीन प्रयोग करण्यात दंग राहिले होते.

वैद्यकीय व्यवसायामध्ये ही नानांनी खूप नाव कमावले आहे. ज्या काळामध्ये तपासणीची कमीत कमी साधने उपलब्ध होती. स्टेथसकोप आणि प्रेशर तपासायचे मशीन याशिवाय अन्य कोणतीही साधने उपलब्ध नसताना रोगाचे निदान केवळ लक्षणे आणि सर्वसाधारण तपासणी करण्याचा तो जमाना होता. परंतु त्या काळातील डॉक्टरांच्या बरोबरीने त्यांनी व्यवसायामध्ये अल्पावधीतच नाव कमावले होते आणि आजही ते टिकून आहे. खरे तर एवढयाच साधनसामुग्रीनिशी ते रोग्यांना तपासत असत हे लक्षणीय आहे. मी प्रत्यक्ष याचा अनुभव घेतला आहे. माझ्या एका मित्राचा खोकला बरा होत नव्हता .तेव्हा मी त्याला डॉक्टर पानवलकर यांचेकडे जाण्याचा सल्ला दिला होता. केवळ स्टेथसकोपच्या सहाय्याने तपासणी करून त्यांनी मित्राच्या हृदयाची झडप बाद झाली असावी ,असा खात्री वजा संशय व्यक्त केला होता आणि तो खराही ठरला. पुढे त्यांनी मला फोनवरून त्याबाबतची माहिती दिली आणि त्या मित्राचे ऑपरेशन होऊन तो पुढे उत्तम आयुष्य जगला .आणखी एक अशीच आठवण मी आणि सर्वांना परिचित असलेले बॅडमिंटन खेळाडू मामा हजारे एकदा पोस्टऑफिस जवळून दुपारी 1 च्या सुमारास घरी येत होतो, आम्हाला बघून दवाखाना बंद करून घरी जात असलेल्या डॉक्टरांनी गाडी थांबवून सहज चौकशी केली. मामाला म्हणाले कुठून तरी मिसळ हादडून आलेले दिसताय .मामा हसत म्हणाला छे हो नाना दोन तीन दिवस भूक लागत नाहीये. डॉक्टरांनी मामाला खाली मान करून चेहरा दाखवायला सांगितले .आम्हाला वाटलं काहीतरी चेष्टा करणार आता. पण डॉक्टरांनी मामाला लगेच सांगितले तुला काविळ झालेली आहे .असाच परत मागे जा आणि नंदू कडून म्हणजे माझ्याकडून लगेच रक्त तपासून घे. मामा हादरलाच पण ज्या आत्मविश्वासाने डॉक्टरांनी रोगनिदान सांगितले त्यामुळे आम्ही परत फिरलो आणि खरोखरच तपासणीमध्ये कावीळ झाल्याचे आढळून आले. सर्व तपासण्या आधी करायच्या आणि मग निदान करायचे या आताच्या जमान्यातील पद्धतीची आवश्यकता त्यांना भासत नव्हती. डॉक्टरांनी त्या काळातील रुग्णांची गरज लक्षात घेऊन नाक कान घसा डोळे आदि विषयक रोगांचा अभ्यास करून औषधे दिली होती .अर्थात त्या काळामध्ये रत्नागिरीमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध नव्हते तरीही रुग्णांची सोय झाली ती अशा डॉक्टरांमुळे .नानांनी रत्नागिरीजवळच्या पानवळ गावामध्ये गेली अनेक वर्षे धर्मार्थ दवाखाना ही सुरू ठेवला होता. तो धर्मार्थ आहे तेथे गेले काय आणि नाही गेले काय असा विचार कधीही नानांनी केलेला नाही .ज्या दिवशी दवाखान्याचा वार असेल त्या दिवशी कितीही खेळ रंगलेला असेल तरी तो बाजूला ठेवून नाना त्यांच्या दवाखान्यासाठी रवाना होत असत याचा आम्हा खेळाडूंना वेळोवेळी अनुभवआलेला आहे. म्हणजे वैद्यकीय व्यवसायामध्ये ही त्यांचे योगदान अत्यंत लक्षणीय होते हे विसरता येणार नाही.

नानांच्या आठवणींच्या निमित्ताने त्यांचा बॅडमिंटन खेळ आणि त्यांच्या उतारवयातील सक्षमतेबद्दल बरेच काही लिहिले जाईल .ते पचनी पाडून घेण्याच्या फंदात कोणीही पडू नये. कारण नियमित व्यायाम, समतोल आहार पण त्याच बरोबर आक्रमक विचार आणि खेळ हे समीकरण फक्त नानांच्या बाबतीतच जुळणारे आहे, हे कबूल करावेच लागेल .व्यक्तिगत, सामाजिक, सार्वजनिक आणि क्रीडा या सर्वच क्षेत्रात नानांचा सहभाग जीवनाचा अंतिम प्रवास सुरू होईपर्यंत होता हे विसरून चालणार नाही .माझे आणि त्यांचे वैचारिक मतभेद कधी कधी झाले देखील पण ते त्यांच्या वैयक्तिक उच्च दर्जाच्या खेळाबद्दल नव्हे तर क्रीडा संघटनेच्या किंवा बॅडमिंटनच्या प्रसार याबाबतच्या विषयावरून. पण त्याचा परिणाम आमच्या मध्ये दुरावा निर्माण न करता आम्ही अधिकाधिक जवळ राहिलो याचे खरे श्रेयही डॉक्टर पानवलकर म्हणजे नानांचे. त्यांच्या आत्मचरित्राचे निमित्ताने परीक्षण वजा लिखाण करण्याचे नानांनी मला स्वतः भेटून हक्काने सांगितले होते. त्या प्रसंगातून मतभेद असले तरी मनभेद नव्हते हाच अनुभव नानांनी मला दिला. नाना हे जसे मला वाटले जसे मी अनुभवले तसेच मी लिहिले आहे.

सोशल मीडियावरआजकाल राजकारणातील एक उदघोषणा प्रसिद्ध आहे .’करून दाखवलं’! अर्थात ती राजकारणामधील असल्याने त्यात खरं काय आणि त्यात तथ्य काय हा संशोधनाचाच विषय असतो .पण वयाच्या 80 वर्षाहून अधिक काळ निरोगी आणि शिस्तबद्ध आयुष्य जगणाऱ्या डॉक्टर नानांनी ‘करून दाखवलं ‘हे समजून घ्यायचं असेल तर नानांचे ‘मी अजिंक्य’ हे आत्मचरित्र वाचावेच लागेल. कै.नानांनी बॅडमिंटन मधून क्रीडाक्षेत्र, रिमांड होमच्या कामातून नगर परिषदेच्या माध्यमातूनआणि रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्र तर रोज सोसायटीच्या माध्यमातून गुलाबांच्या क्षेत्रात अशा अनेक संस्थांमध्ये यशस्वी प्रवास केला होता ,हे आत्मचरित्र वाचल्यावरच तुमच्या लक्षात येईल येईल. तुम्हा-आम्हाला जगण्यासाठी रोजचे 24 तासात मिळतात, नानानाही तेवढेच मिळाले ना, मग नानांनी एवढ्याच 24 तासात वरील संस्था, पर्यटन ,लिखाण, दैनंदिन व्यायाम ,खेळ आणि यशस्वी वैद्यकीय व्यवसाय हे सर्व कसं केलं असेल ? केवळ अतुलनीय असे जीवन आणि तेही अंतिम प्रवासापर्यंत डॉक्टर नाना जगले त्यांच्या जीवनातून आपणा सर्वांना बोध घेण्यासारखं नक्कीच काहीतरी आहे .वैद्यकीय व्यवसायातील यश आणि सातत्य म्हणजे डॉक्टर पानवलकर, रोटरीचे उपक्रम म्हणजे डॉक्टर पानवलकर, रोझ सोसायटी म्हणजे डॉक्टर पानवलकर ,रिमांड होमच्या माध्यमातून सामाजिक काम म्हणजे डॉक्टर पानवलकर, रत्नागिरीमधील बॅडमिंटन म्हणजे डॉक्टर पानवलकर आणि जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत म्हणजे काल आजपर्यंत चिरतरुण आयुष्य जगणारे म्हणजे डॉक्टर पानवलकर! आणि म्हणूनच ‘मी अजिंक्य’ म्हणण्याचा ज्यांचा अधिकार तेही ‘डॉक्टर पानवलकरच’!

त्यांचे हे अजिंक्यपद अढळच होते. पण मानवी जीवनाला मृत्यू अटळ आहे.तरीदेखील तुमच्या आमच्या सारख्यांच्या मनामध्ये ते कायम तसेच राहणार आहेत यात मला तरी शंका वाटत नाही. कै.नानांना सद्गती लाभो ,हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here