
पतीने मुंबईला नेण्यास नकार दिल्याने तिर्लोट आंबेरी पुलावरून दोन लहान मुलांसह मातेने खाडीच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवले, सिंधुदुर्गातील घटना
पतीने मुंबईला नेण्यास नकार दिल्याने तिर्लोट आंबेरी पुलावरून दोन लहान मुलांसह मातेने खाडीच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवल्याची घटना सिंधुदुर्गात घडली आहे
तिर्लोट आंबेरी पुलावरून दोन लहान मुलांसह मातेने खाडीच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवल्याची ह्दय पिळवटून टाकणारी घटना देवगड तालुक्यातील आंबेरी येथे घडली असून या घटनेने संपूर्ण देवगड तालुका हादरला आहे.मातेसह दोन्ही मुलांचे मृतदेह गुरूवार (दि. १७) एप्रिल रोजी मिळाले. पतीशी फोनवर आपल्याला व मुलांना मुंबईला घेवून जाण्याबाबत वादावाद करून घरात काहीही न सांगता दोन्ही मुलांना घेवून गेलेल्या मातेने दोन्ही मुलांसह जीवन संपवल्याच्या घटनेने देवगड तालुका सुन्न झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेंल्या माहितीनूसार, तिर्लोट आंबेरी पुलावरून खाडीच्या पाण्यात उडी मारून आपल्या पाच व चार वर्षाच्या लहान मुलासह आत्महत्या करणा-या महिलेचे नाव श्रीशा सुरज भाबल (२४) असून तिच्यासमवेत तिचे दोन लहान मुलगे श्रेयश (५) व दुर्वेश (४) हे होते. श्रीशाने या दोन लहान मुलांसमवेतच पुलावरून पाण्यात उडी मारली.
तिर्लोट आंबेरी येथील सुरज सुहास भाबल यांच्याशी श्रीशा हिचा २२ जुन २०१८ रोजी विवाह झाला. श्रीशा हिचे माहेर कर्नाटक रायचुर येथील असून ती आई वडीलांसमवेत कल्याण येथे राहत होती. तिचे पती सुरज भाबल हे नोकरीनिमित्त मुंबई दादर येथे राहत असून रेल्वेमध्ये नोकरीस आहेत. त्यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली. श्रीशा ही तिचे दोन लहान मुलगे श्रेयश व दुर्वेश यांच्यासमवेत सासरी तिर्लोट आंबेरी येथे सासरे सुहास शिवराम भाबल, सासू सुहासिनी, दीर मिलींद यांच्यासमवेत राहत होती.
दि. १५ एप्रिल रोजी दुपारी ३ च्या दरम्यान श्रीशा हि आपल्या पतीशी फोन वरून मुंबईला घेवून जाण्याबाबत बोलत होती. परंतू पती सुरज याने मुंबई येथे राहण्याची व्यवस्था नसल्याने तीला मुंबईला घेवून जाण्याबाबत नकार दिला. यावेळी रागाने श्रीशा ही सासू व सासरे यांना न सांगता त्याच सायंकाळी ५.४५ वा. दोन्ही लहान मुलांना घेवून घरातून निघून गेली. तीचा आजुबाजुला शोध घेवूनही ती मिळाली नाही.
श्रीशा यापुर्वीही अशीच घरातून निघून गेलेली होती. मात्र ती परत घरी आली होती. दि. १६ एप्रिल रोजी सकाळी घरातील मंडळी तिचा शोध घेत होते. सायंकाळी ५.३० वा. तिर्लोट आंबेरी खाडीमध्ये आंबेरी जेटीजवळ त्यांचे मृतदेह आढळून आले