‘झोपलेला सुशिक्षित’ जागा झाला आणि कोकण विकास समितीची निर्मिती करून नाणार रिफायनरीला जिल्ह्यात आणण्यासाठी सज्ज झाला
रत्नागिरी ः गैरसमजुती आणि पूर्वग्रहावर आधारित विरोध करून नुकसान करून घेण्यापेक्षा कारखान्याच्या रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण करण्याच्या प्रचंड क्षमतेचा विचार करून तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या स्वागताची भूमिका घेणे इष्ट आहे. प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याच्या भूमिकेकडे शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टीने २० जुलै रोजी रत्नागिरीत प्र्रकल्प समर्थकांचा मोर्चा आयोजित केला आहे, अशी माहिती कोकण विकास समितीतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
आम्ही सर्व या कोकण मातीची लेकरं आहोत, या भूमिच्या निसर्गसौंदर्यावर आमचे प्रेम आहे परंतु सरसकट विरोध न करता सर्वांगीण प्रादेशिक विकासाची कास धरून आर्थिक नकाशावर कोकणाचे ठळक स्थान निर्माण करण्याचे महत्व ओळखले पाहिजे, असे समितीचे प्रवक्ते अविनाश महाजन व केशव भट यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक टी. जी. शेट्ये, उद्योजक राजीव कीर, महेंद्रशेठ जैन, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूरदेसाई, उद्योजक उदय लोध व समितीचे अन्य मान्यवर उपस्थित होते.
आपण सुशिक्षित आहात मग प्रकल्प जाईपर्यंत झोपला होतात का? या प्रश्नावर उत्तर देताना समितीचे कौस्तुभ सावंत यांनी सांगितले की, त्यावेळी जागे व्हायला पाहिजे होते हे खरे आहे परंतु त्यावेळी प्रकल्पाचे महत्व आम्हाला कळले नव्हते. या प्रकल्पातून जिल्ह्याचा केवढा मोठा विकास होणार आहे व जिल्ह्याचे केवळे मोठे आर्थिक गणित बदलणार होते तसेच जिल्ह्यातील सर्वांना केवढा मोठा रोजगार मिळणार होता हे आम्हाला कळले नव्हते हे आपण नम्रपणे मान्य करतो. जेव्हा ते कळल्यावर आम्ही ती चूक सुधारून कोकण विकास समितीची निर्मिती करून एक सकारात्मक चळवळ निर्माण केली आहे. ही समिती पोटतिडकीने एकत्र आलेल्या कोकणाविषयी प्रेम असणार्या सर्वांची आहे. त्याचे सर्वांनी स्वागत करणे गरजेचे आहे. कारण त्यामध्ये कुणाचा वैयक्तिक स्वार्थ नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. हा प्रकल्प पर्यावरण, फलोत्पादन आणि मच्छी व्यवसायाला कसा हानीकारक नाही याबद्दल समितीच्यावतीने देण्यात येणार्या वास्तव माहितीला जिल्ह्यामध्ये तसेच खुद्द नाणारमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नाणारमधील या प्रकल्पासाठी जाणार्या ७० टक्के लोकांनी प्रकल्पासाठी जमिनी देण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक संस्था या प्रकल्पाच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत.
३ लाख कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक असणार्या या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून त्यातून भावी पिढीला नोकरी उद्योगासाठी स्थलांतरित व्हावे लागणार नाही. हा प्रकल्प आल्यानंतर या प्रकल्पातून प्रदूषण होवू नये यासाठी कोकण विकास समिती दबावगट म्हणून काम करेल असेही स्पष्ट करण्यात आले. यामुळे परत एकदा रिफायनरी प्रकल्प उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.