वनविभागाकडून उपाययोजना होत नसल्याने मेरवी परिसरातील ग्रामस्थ भयभीत
रत्नागिरी ः गेल्या काही महिन्यात गणेशगुळे, मेर्वी, मावळंगे आदी भागात ग्र्रामस्थांवर बिबट्याने हल्ला केल्याने ग्र्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याचे दर्शन अधूनमधून ग्रामस्थांना होत असल्याने या बिबट्याला पकडण्यात यावे अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली होती परंतु वन विभागाने अद्यापही काही कारवाई केलेली नाही.
आठ दिवसांपूर्वी व्यायाम शाळेत जाणार्या तरुणांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले होते. या भागात मोठ्या प्रमाणावर घरामधून पालेभाज्या व भाज्या केल्या जातात. या भाज्या विक्रीसाठी शहरात आणल्या जातात. त्यासाठी त्या भागातील ग्रामस्थांना पहाटे या मार्गावरून जावे लागते. याशिवाय गावातील ग्रामस्थ नोकरीसाठी कार्यालय तर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी या मार्गावरून पहाटे जावे लागते. सध्या तरी गावात बिबट्यामुळे भीतीचे वातावरण असून बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.