
आईवरून शिवी दिली म्हणून डोक्यात कुर्हाड घालून केला खून; मृतदेह टाकला पायवाटेवर, पोलिसांनी प्रकार आणला उघडकीस
गुहागर : आईवरून शिवी दिली म्हणून चिखली मांडवकरवाडी येथे एकाच्या डोक्यात कुर्हाड मारून खून केल्याची घटना घडली. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. मित्रानेच मित्राचा खून करून त्याचा मृतदेह एका पायवाटेवर आणून टाकला. गुहागर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला ताब्यात घेतले.
अनंत तानू मांडवकर (वय 48) आणि सुनील महादेव आग्रे (वय 45) हे दोघे मित्र होते. शनिवारी (दि. 20) सायंकाळी त्या दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी आईवरून शिवीगाळ केल्याचा राग आल्याने सुनीलने अनंतच्या डोक्यात कुर्हाड मारली. यामध्ये अनंत जागीच ठार झाला. शनिवारी रात्री उशिरा सुनीलने अनंतचा मृतदेह मांडवकरवाडीतील एका पायवाटेवर आणून टाकला.
रविवारी (दि. 21) सकाळी काही ग्रामस्थांना पायवाटेवर पडलेला अनंतचा मृतदेह दिसला. पोलिसपाटलांनी गुहागर पोलिसांना हा प्रकार सांगितला. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते हे पोलिस उपनिरीक्षक पवन कांबळे, राजेश धनावडे, वैभव चौगले, प्रतीक रहाटे, हनुमंत नलावडे, आनंदराव पवार, स्वप्नील शिवलकर, तडवी, गणेश कादवडकर, घोसाळकर, फुटक यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाचपुते यांनी पोलिसांच्या टीम करून तपासकामाला सुरुवात केली.
अनंत आणि सुनील हे दोघेही तापट व भांडखोर स्वभावाचे होते. एकाच ठिकाणी कामाला जात असल्याने या दोघांची मैत्री होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुनीलवर लक्ष केंद्रीत केले. सुनील आग्रेच्या घराची कसून तपासणी केली असता घराचे दार, छत्री आणि पायरीवर रक्ताचे डाग दिसून आले. घरामधील जमीन पुसून काढल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. अधिक चौकशीअंती सुनील याने आपणच खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी सुनील याला अटक केली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते करीत आहेत.