
लोकसभा निवडणुकीत डिपॉझीट जप्त झालेल्या कॉंग्रेसला हवे आहेत जिल्ह्यातील अन्य मतदारसंघ
रत्नागिरी ः लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकर यांना केवळ ३५ हजार मते मिळाल्याने त्यांचे डिपॉझीट जप्त झाले. मात्र रत्नागिरी येथे पार पडलेल्या कॉंग्रेसच्या राज्य निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत चिपळूण, रत्नागिरी, राजापूर हे मतदारसंघ कॉंग्रेसला मिळावेत अशी मागणी निरिक्षकांकडे केली. सध्या जिल्ह्यातील कॉंग्र्रेसची अवस्था हलाखिची आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या अध्यक्षांवरच पक्षासाठी काम न केल्याचा आरोप झाला. जिल्ह्यातील कॉंग्रेसमध्ये अनेक गटबाजी असून त्याचा फटका पक्षाला बसत आहे. एकीकडे भाजप सेना युतीला विरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत असले तरी दापोली नगरपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसने शिवसेनेबरोबर युती केली आहे. यामुळे पक्ष कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. याबाबत उपस्थित असलेल्या कॉंग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांनी विधानसभा मतदार संघ बदलण्याचा अंतिम निर्णय कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते देतील असे सांगून जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी युतीशी लढण्यासाठी गट-तट बाजूला ठेवून एकत्र यावे असा सल्ला कॉंग्रेस कार्यकर्त्यांना दिला.