
रत्नागिरी तालुक्यात भीषण पाणीटंचाई, प्रशासनाकडे अपुरी यंत्रणा
रत्नागिरी ः गेल्या वर्षीच्या तुलनेत रत्नागिरी तालुक्यातील केवळ साखरतर गावात पाणी टंचाई होती. यावर्षी तालुक्याचा ७० टक्के भाग टंचाईग्रस्त आहे. केवळ तीन टँकर उपलब्ध आहेत. खासगी टँकरचा दर परवडत नाही, मागणी करूनही टँकर मिळत नाही अशी परिस्थिती असल्याची माहिती पाणी विभागाचे अधिकारी श्री. उपाध्ये यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत दिली. पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी पंचायत समितीतील सत्ताधार्यांना अपयश आल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
रत्नागिरी पंचायत समितीची मासिक बैठक सभापती विभांजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील पाणी टंचाईच्या भीषणतेचे वास्तव समोर आले. यावर्षी, उक्षी, साखरतर, केळ्ये, आगरनरळ, गावडेआंबेरे, नाचणे, कुवारबांव, नाणीज, जयगड या भागात पाण्याची टंचाई आहे.