
दुष्काळाबरोबरच महागाईत वाढ
रत्नागिरी ः जिल्ह्यासह राज्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असतानाच काही ठिकाणी दुष्काळाचे सावटही आवासून उभे आहे. त्यातच महागाईचा डोंगर गगनाला भिडण्याच्या तयारीत उभा ठाकला आहे.
जून महिना सुरू झाला आणि जनतेची खरेदीसाठी लगबग सुरू झाली. पावसाळ्यापूर्वी खरेदी करण्यात येणार्या डाळी विविध प्लॅस्टीकच्या वस्तू, धान्य आणि विद्यार्थ्यांची पुस्तके, वह्या, घर शाकारण्याचे साहित्य या सर्वांचे दर गगनाला भिडले आहेत. पावसाळा काही दिवसांवर येवून ठेपला असून बाजारामध्ये पावसाळ्यापूर्वी खरेदीसाठी लगबग उडाली आहे. खरेदी करताना माताभगिनींचे बजेट सावरता सावरता नाकीनऊ आले आहेत.
सध्या बाजारात डाळीनी शंभरी पार केली असून दुकानाध्ये तुरडाळ १०० ते १४० रु. किलो, मुगडाळही १०५ रुपये, उडीद डाळ १२० रुये आदीसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भयानक वाढल्या आहेत. सामान्य ग्राहक या संकटामुळे भरडला जात असून गेल्या दोन महिन्यात सर्व प्रकारच्या डाळींच्या भावात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली असून आगामी काळात अजून भाव वाढतील असे दुकानदारांकडून बोलले जात आहे.