
चार महिने लोटले तरी रत्नागिरीतील मच्छीमारांच्या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली नाही…
रत्नागिरी : चार महिने होऊन गेले तरी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या मच्छीमारांच्या उपोषण आंदोलनाची शासन पातळीवर कोणतीच दखल घेतली गेलेली नाही. आता उपोषणस्थळावरचा मंडप काढला जात असून त्या ठिकाणी घोषणांचे फलक जमिनीत रोवून ठेवण्यात आले आहेत. गेल्या 3 जानेवारीपासून पर्ससीननेट मच्छीमार व मालकांनी साखळी उपोषण सुरु केले होते. मासेमारीची पावसाळी बंदी 1 जूनपासून सुरु होणार असल्याने मच्छीमार नौका मिरकरवाडा बंदरात उभ्या केल्या जात असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती उपाययोजना केली जात आहे. दि. 10 मे पासून मच्छीमार नौका बंदरात शाकारल्या जाऊ लागल्या आहेत. आता मासेमारीच बंद होणार असल्याने साखळी उपोषणात काही अर्थ उरला नव्हता. या पार्श्वभूमीवर उपोषण आंदोलनासाठी उभारलेल्या मंडपात आंदोलकांची गर्दी ओसरु लागली होती. त्यानंतर आता उपोषण स्थळावरचा मंडपही काढून घेण्यात आला आहे.
नवीन सुधारित मच्छीमार कायद्यातील अटी विरोधात गेल्या 3 जानेवारीपासून साखळी उपोषण आंदोलन सुरु झाले होते. आंदोलनाच्या सुरवातीच्या काळात येथे जोरदार घोषणाबाजी केली जात होती. परंतु, आता हा परिसर आता शांत झाला आहे.