जागेवरून प्रवाशांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या

0
221

खेड ः रेल्वे प्रवाशांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या प्रवाशाने उपचार घेतल्यानंतर पुन्हा रेल्वे पटरीवरून चालत जात रेल्वेखाली आत्महत्या केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. खेड येथे भोस्ते बोगद्यात हा प्रकार रविवारी रात्री ८ वा.च्या सुमारास उघडकीस आला. मृताची ओळख पटविण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.
मडगावहून सीएसटीकडे जाणार्‍या रेल्वेतून हा प्रवासी प्रवास करत होता. चिपळूण खेड दरम्यान त्याचा बसण्याच्या जागेवरून सहप्रवाशांशी वाद झाला. त्यातून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. सायंकाळी ४ च्या सुमारास ही रेल्वे खेड स्थानकात आली असता त्याला तेथे उतरविण्यात आले. डोक्याला दुखापत झालेली असल्यामुळे रेल्वेस्थानकात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
उपचारानंतर आपल्याला बरे वाटत असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे त्याला सोडून देण्यात आले. तेथून तो पुन्हा रेल्वे स्थानकात आला व रेल्वे पटरीवरून रत्नागिरीच्या दिशेने चालत गेला. रात्री ८ वा. च्या सुमारास भोस्ते बोगद्यात त्याचा मृतदेह सापडला. त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात ाहे.