
ऐन हंगामात रत्नागिरी-दादर पॅसेंजरचे दोन डबे कमी केल्याने प्रवाशांत संताप, सामाजिक नेते शौकत मुकादम यांचा अधिकार्यांना घेराव घालण्याचा इशारा
रत्नागिरी ः कोकण रेल्वे मार्गावरील सर्वसामान्य प्र्रवाशांच्यात लोकप्रिय ठरलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजरचे दोन डबे ऐन हंगामात कमी केल्याने प्रवाशांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सुट्टीचा हंगाम असल्याने कोकण रेल्वेच्या सर्वच गाडया फुलून गेल्या आहेत. त्यामुळे या पॅसेंजरला सामान्य लोकांची मोठी पसंती आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून या पॅसेंजरचे दोन डबे अचानक कमी करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सध्या दोन दिवस १८ डब्यांऐवजी १६ डबेच गाडीला लावले जात असल्याने प्रवाशांचे मोठे हाल निर्माण झाले आहेत. वास्तविक उन्हाळी सुट्ीत या गाड्यांच्या डब्यांच संख्या वाढविणे आवश्यक असताना त्याऐवजी असलेले डबे कमी केल्याने एक प्रकारे रेल्वेने प्रवाशांची चेष्टाच केल्याचे बोलले जात आहे. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून जर हे डबे पुर्ववत केले नाहीत तर अधिकार्यांना घेराव घातला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.