
मुंबई-गोवा महामार्गावरील आणखी एक घाट धोकादायक
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटासह अनेक भागात दरडी कोसळण्याचे प्रकार घडल्यामुळे अनेकवेळा वाहतूक बंद ठेवण्याची वेळ येत आहे. भोस्ते घाटातही दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. प्रशासन तत्परतेने या दरडी हलवण्याचे काम करीत असल्यामुळे काही तासांनी का होईना परंतु या मार्गावरून वाहतूक सुरू होते. आता त्यापाठोपाठ मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातही एका भागात रस्त्याला भेगा पडल्याने हा भाग देखील वाहतुकीला धोकादायक बनला आहे. गेले काही दिवस संपूर्ण कोकणात अतीवृष्टी होत असून त्याचा परिणाम म्हणून माती रस्त्यावर येण्याचे दरीकडील भाग खचण्याचे व भेगा पडण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. आता कशेडी घाटातही एका वळणावर महामार्गाच्या रस्त्याला भेगा पडल्याने व या भेगा रूंदावल्याने याची दखल पोलिसांनी घेतली असून या मार्गावरून वाहने सावकाश चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणी बॅरिगेटस् लावण्यात आली आहे. धोकादायक भाग वगळून एकेरी वाहतूक सुरू आहे. मात्र अजूनही पावसाचा जोर वाढला तर तात्पुरती डागडुजी केलेला हा भाग खचण्याचा संभव आहे.