
महिला व मुलींसाठी आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने नवनिर्माण शिक्षण संस्था, लोवले येथे आयोजन
संगमेश्वर :- जागतिक महिला दिनानिमित्त उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने नावडी आणि फुणगुस पंचायत समिती गणातील महिलांसाठी व मुलींसाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संगमेश्वर जवळच्या लोवले येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलात या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रज्ञा कदम, प्राचार्य संजना चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्या माधवी गीते, सरपंच ऋतुजा कदम, मनोहर गीते, संदीप रहाटे आदी मान्यवर उपस्थित होते. महाआरोग्य शिबिरासाठी बुरंबी, सायले, वांद्री, फुणगुस, कोंडउमरे, आदी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचारी उपस्थित राहून आरोग्य तपासणी केली. यावेळी बोलताना चेअरमन अभिजीत हेगशेट्ये म्हणाले की महिलांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन होणे आवश्यक असून विज्ञान दृष्टिकोन आचरणे आवश्यक आहे विटाळ परंपरा समूळ नष्ट करणे आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी प्राचार्या प्रज्ञा कदम म्हणाल्या की, महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महाआरोग्य शिबिरे हातभार लावतील असे सांगत हा उपक्रम स्तुत असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या माधवी गीते म्हणाल्या की, महिलांनी आपले आजार लपवून न ठेवता ते बोलून दाखवणे आवश्यक आहे तरच त्या आजारांवर लवकर उपचार करणे शक्य होईल असे सांगितले. सदर महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी संदीप रहाटे, मनोहर गीते, संजय कदम, ओंकार चव्हाण, आतिष पाटणे, राजू कदम, निलेश खापरे, जमुरत अलजी, संजय खातू, महेश देसाई आदींनी प्रयत्न केले.