मांडवी एक्स्प्रेसमधून दहा लाखांचे दागिने चोरीला
चिपळूण – कोकण रेल्वेच्या मांडवी एक्सप्रेसमधून प्रवास करून चिपळूण स्थानकावर उतरत असताना सुमारे दहा लाख चोवीस हजार रुपयांचे मौल्यवान दागिने चोरीला गेल्याची घटना काल घडली आहे. अलोरे येथील राहणारे गोविंद कदम हे आपल्या कुटुंबियांसह मांडवी एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. काल ते चिपळूण स्थानकात दुपारी उतरत असताना त्यांच्या सामानात असलेला दागिन्याचा डबा चोरीला गेला. या डब्यात सुमारे दहा लाख चोवीस हजार रुपयांचे दागिने होते. प्रवास करताना सुरक्षिता म्हणून त्यांनी एका डब्यात दागिने ठेवले होते.डबा त्यांची सून सुशिला कदम हिने खांद्याला असलेल्या पर्समध्ये ठेवला होता. उतरताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील हा डबा लांबवला. कोकण रेल्वेत चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असून अद्यापही चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.