
शासनाच्या विविध योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा – मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार
* रत्नागिरी, दि.1 :- शासनाच्या विविध विभागांमार्फत अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनेचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा, विशेषत: कृषी विभागाच्या माध्यमातून महिला शेतकरी उत्पादक निर्माण व्हावे, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी व्यक्त केली. कृषी दिनानिमित्त करबुडे ग्रामपंचायतीमध्ये आज प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच संस्कृती पाचकुडे, उपसरपंच करिष्मा गोताड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गट विकास अधिकारी जयेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, कृषी विकास अधिकारी अजय शेंडे आदी उपस्थित होते. सुरुवातीला ग्रामदैवत मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर माध्यमिक विद्यालय करबुडे-लाजूळच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढली. हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रामपंचायत येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांने आजच्या कृषी दिनानिमित्ताने प्रत्येकाने एक वृक्ष लावावे. निसर्गाने कोकणाला भरभरुन दिले आहे. येथील नैसर्गिक साधन सामुग्रीचे संवर्धन करणे आणि जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. भविष्यात कोणत्याही क्षेत्रात प्रगती करत असताना जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडा. उपस्थित ग्रामस्थ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. पुजार म्हणाले, कृषी ही खूप मोठा विषय आहे. कोकण हा कातळ, डोंगरी भाग आहे. जसा इथला शेतकरी पावसाळ्यात भात, नाचणी पीक घेतो, त्याचपध्दतीने उन्हाळ्यात देखील शेत जमीन पडिक न ठेवता, विशेषत: भाजीपाला उत्पादनावर भर दिला पाहिजे. शेतीमधील नवनवीन प्रयोग करण्यासाठी आजच्या कालावधीत माहिती घ्यायला कोणतीही कमतरता नाही, ती सर्वत्र उपलब्ध आहे. करबुडे ग्रामपंचायतीने स्वत:पासून असे नवनवीन प्रयोग करावेत. त्यासाठी योजनांची 100 टक्के अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणले. प्रास्ताविकात गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी शेतकऱ्यांने निश्चित शेतीमध्ये बदल करावेत. बाजारातील मागणीनुसार लागवड करावी. विकसित शेतकरी, विकसित खेडं निर्माण करण्याची संधी सोडू नये, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.