भाजप युवा नेते संदेश पारकर यांनी कणकवलीत रोखले महामार्गाचे काम

कणकवली,ता.०६: महामार्गालगतचे महाडिक कॉम्प्लेक्स तोडण्यासाठी महामार्ग विभागाचे अधिकारी आज पोलीस बंदोबस्तात नरडवे तिठा येथे सकाळपासून दाखल झाले होते.मात्र भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर या पथकाला तेथून मागे जावे लागले. तसेच त्या इमारतीचा तोडलेला वीज पुरवठा देखील पूर्ववत करण्यात आला.बाधित इमारती मधील सर्व गाळेधारकांना आधी नोटीसा द्या नंतरच इमारत तोडा.तसेच नोटीस न देता इमारतीचे बांधकाम आम्ही तोडू देणार नाही असा इशारा देखील पारकर यांनी दिला आहे.
शहरातील महामार्गालगत नरडवे तिठा येथील महाडिक कॉम्प्लेक्स तोडण्याची कारवाई आज केली जाणार होती.त्यासाठी महामार्ग उप अभियंता प्रकाश शेंडेकर, दिलीप बिल्डकॉनचे, रविकुमार आदी मंडळी पोलिस बंदोबस्तात आज सकाळी दहा वाजल्यापासून घटनास्थळी दाखल झाली होती.इमारत तोडण्यासाठी पोकलेन मशीन देखील आणण्यात आली होती.ही माहिती समजतात भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.आधी बाधित इमारतीमधील सर्व गाळेधारकांना नोटीसा द्या नंतरच ती इमारत तोडा अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
यानंतर श्री पारकर महामार्ग उपअभियंता शेंडेकर यांनी प्रांताधिकारी कार्यालयात या मुद्द्यावर सुमारे तीन तास चर्चा केली.या चर्चेत गाळेधारकांना नोटीस न देता इमारत पाडणे हे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर महामार्ग विभागाचे पथक इमारत न तोडताच तेथून माघारी गेले.महाडिक कॉम्प्लेक्स तोडण्यात येणार असल्याने या इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.मात्र इमारत तोडण्याची कारवाई स्थगित करण्यात आल्याने तो पुन्हा पूर्ववत करण्यात आला.

Related Articles

Back to top button