
२३ मे नंतर राज्यभरात परिवर्तन घडेल- मा.सुनील तटकरे
रत्नागिरी दि०४-राजकारणात एक सभ्यता असावी लागते. ३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी सभ्यता पाळली, मात्र केंद्रीय मंत्र्यांना डोळ्यासमोर पराभव दिसू लागल्याने त्यांनी खालच्या पातळीवर आरोप केले.मात्र यावेळी आघाडीला अनुकूल वातावरण असल्याने २३ मे नंतर किती दृश्य हातांनी मला मदत केली याचे चित्र स्पष्ट होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमदार सुनील तटकरे यांनी केले. ते आज रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे हे शुक्रवारी रत्नागिरीत आले होते. दिवंगत माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते रत्नागिरीत आले होते. विकासाला चेहरा देणारं रत्नागिरीकरांचे छत्र हरपले, शेट्ये यांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना त्यांनी निवडणुकीच्या निकालाबाबत चर्चा केली. महाआघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो. २५ वर्ष विधिमंडळात काम केलं. पक्षादेशामुळे आता संसदेची निवडणूक लढवली. २०१४ रोजी माझ्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवारामुळे आपल्याला पराभवाचा सामना पत्करावा लागला. यावेळी मात्र योग्य ती खबरदारी घेतली होती. राज्यात आघाडीला अनुकूल वातावरण आहे. गेल्या सात टर्ममध्ये मतदान न करणाºया अनंत गीतेंनी यावेळी मतदान केले, माझ्या आरोपांची दखल घेतल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान राज ठाकरे यांच्या जाहीर सभांबद्दल बोलताना तटकरे म्हणाले की त्यांच्या सभेला ग्लॅमर निर्माण झालं आहे. लोकं उत्स्फूर्तपणे सभेला उपस्थित राहत होती. लोकशाहीला काय घातक आहे हे राज ठाकरे यांनी दाखवून दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक असेल असे मत देखील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले, राज्यात दुष्काळ आहे, जनावरांना पाणी नाही चारा नाही. कोणत्याही उपाययोजना नाहीत. सर्व स्तरावर सरकार फेल ठरलं आहे. युतीमध्ये आयातनिर्यात या निवडणुकीत पाहायला मिळाली. २०१४ सालची निवडणूक सर्वात वाईट होती. मात्र वातावरण अनुकूल असल्याने २३ मे नंतर परिवर्तन घडेल. हे परिवर्तन राज्यभर जाईल. निकाल अनुकूल लागला तर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील असे भाकीत त्यांनी यावेळी केले.
नारायण राणे वजनदार नेते
नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील वजनदार नेते आहेत. मंत्रीपदाच्या कालावधीत त्यांनी ख-या अर्थाने कोकणला न्याय दिला. त्यांनी केलेले काम हे निश्चितच दखलपात्र आहे. मध्यंतरीच्या कालावधीत राज्यातील राजकारण पाहून त्यांनी नवा पक्ष काढण्याचे धाडस केले. असे धाडस नारायण राणेच करू शकतात. यासाठी त्यांना मानले पाहीजे, अशा शब्दात सुनील तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नव्या राजकीय निर्णयाचे स्वागत केले.