महामार्गावरील विद्युत पोलमुळे नागरिकांच्या जीवाला धोका
चिपळूण ः मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. त्यामुळे स्थलांतरित करण्यात आलेले विद्युत पोल सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणारे ठरू लागले आहेत. फक्त दगडांच्या आधारावर पोल उभा करून त्यावर ११ केव्ही क्षमतेची विद्युत वाहिनी देखील टाकण्यात आली आहे. त्यामुळे जवळच असणार्या घरांना त्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
चिपळूण मधील परशुराम ते आरवली या टप्प्यातील मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. काही ठिकाणी नव्या रस्त्यावरून वाहने देखील धावू लागली आहेत. चौपदरीकरणात मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई आणि जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. साहजिकच झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे. तसेच संपादीत जमिनीत असलेले महावितरणचे विद्युत पोल आणि त्यावरील विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम एका खाजगी ठेकेदाराकडे देण्यात आले असून त्याने देखील कामाला वेग दिला आहे. मात्र हे काम किती तकलादू आणि धोकादायक होत आहे याचा प्रत्यय येथील कामथे परिसरात येत आहे.