
मान्सूनपूर्व पावसामुळे महावितरणचे दीड कोटींचे नुकसान
मान्सूनपूर्व पावसातील वादळामुळे निवडणूक कार्यक्रमात व्यस्त असलेल्या प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे महावितरणचे दीड कोटीचे तर जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांचे पत्रे उडाल्याने लाखांचे नुकसान झाले. जिल्ह्यात ३० हेक्टर शेतजमिनीचे पावसामुळे नुकसान झाले. तिनशेहून अधिक वीज खांब कोलमडून पडल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकाारी चंद्रकांत कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी रत्नागिरी, जीवन देसाई आणि महावितरणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुले-देसाई होते. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ३९.५ मि.मि. इतका पाऊस पडला. कोसळलेल्या वीज खांबांपैकी १३२ पोल बदलले. उर्वरित खांबांचे काम प्रगतीपथावर आहेत. पावसामुळे चिपळूणमधील तुरंबव, सावर्डे या ठिकाणचे महावितरणचे सबस्टेशन बंद पडल्यामुळे बराच काळ वीजप्रवाह खंडित झाला होता. तसेच लांजा, रत्नागिरी आणि राजापूर परिसरातही वीज खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित होता. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर महावितरण काम करत असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. www.konkantoday.com