
जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामावरुन पालकमंत्र्यांची बांधकाम विभागावर नाराजी
रत्नागिरी, दि. 1 ) : जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपुजन 12 वर्षापूर्वी पार पडले. एमआयडीसीने 14 एकरची जागा त्यासाठी दिली. जिल्हा क्रीडा कार्यालयाने 10 कोटी 50 लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा क्रीडा संकुल उभे करु शकत नाही, याबाबत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, प्रांताधिकारी जीवन देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एम.एस. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओठवणेकर, जिल्हाधिकारी क्रीडा अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करणे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. ठेकेदार काम करत नसेल, तर काळ्या यादीत टाकावे. कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर काम पूर्ण केले पाहिजे. बॅडमिन्टन सभागृहाच्या बाबतीत जिल्हा क्रीडा कार्यालयाने फ्लोरिंगसंदर्भातील निविदा प्रक्रीया पूर्ण करावी. लांजा येथील तालुका क्रीडा संकुलच्या जागेबाबत महसूल विभागाकडे प्रस्ताव द्यावा. यावेळी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सर्व तालुक्याच्या क्रीडा संकुलाबाबत आढावा घेतला.
कलावंताच्या अर्जाची छाननी समितीने करावी
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेसाठी आलेल्या अर्जांपैकी कलाकारांची निवड करण्यासाठी आज जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. यावेळी पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, शासनाने घालून दिलेल्या निकषानुसार समिती सदस्यांनी तालुकानिहाय अर्जांबाबत छाननी करावी. तसेच त्याची शहानिशा करावी व आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावा. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील यांनी आलेल्या अर्जांबाबत सविस्तर माहिती दिली.
*शहरातील सौंदर्यात बाधा आणणाऱ्या होर्डींगसह कचरा निर्मूलन करावे*
रत्नागिरी नगर परिषदेने शहराच्या स्वच्छतेवर भर द्यावा. अजूनही काही ठिकाणी शहराच्या सौंदर्यात बाधा आणणारे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे होर्डीग दिसत आहेत. नगर परिषदेने ते हटवावेत. त्याचबरोबर काही परिसरात कचरा दिसून येत आहे. तो निर्मूलन करावा. शहर स्वच्छ सुंदर नीट निटके राहील यावर नगरपरिषदेने भर द्यावा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिली.
रत्नागिरी नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री डॉ. सामंत यांनी घेतला. यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सुरु असलेल्या कामकाजाबाबत तसेच सद्यस्थितीबाबत यावेळी माहिती दिली. पालकमंत्री डॉ. सामंत यांनी काळबादेवी पुलासंदर्भातही बैठक घेऊन आढावा घेतला तसेच पुल करण्याबाबत सविस्तर ग्रामस्थांशी चर्चा करुन सर्वसमावेशक तोडगा काढला.000




