
देवरूख शहरात बिल्डींग मधील सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर
देवरूख शहरात बिल्डींग मधील सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक बिल्डींगमधील सांडपाणी थेट गटारामध्ये सोडण्यात आले आहे. हे पााणी साठून राहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा नाहक त्रास वाहन चालक व परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे देवरूख नगरपंचायतीने लक्ष केंद्रीत करून उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.देवरूख हे संगमेश्वर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. सर्व शासकीय कार्यालये, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय, बँका, देवरूख या ठिकाणी तसेच स्वच्छ हवा, पावसाळ्यात पुराचा धोका नसल्याने तालुक्याच्या कानाकोपर्यात ग्रामस्थ देवरूख नगरीत राहणे पसंत करतात. नागरिक तसेच काही धनाढ्यांनी देवरूख नगरीत जमीन खरेदी करून तिथे बिल्डींग उभारल्या आहेत.बिल्डींग उभारत असताना सांडपाण्याचा प्रश्न कसा मार्गी लावणार याचा विचार केला जातो. सांडपाण्याचा प्रश्न बिल्डींग मालकाने मार्गी लावायचा असा नियम आहे. मात्र बिल्डींग मालकाकडून देवरूख नगरपंचायत प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अनेक बिल्डींगचे पाणी थेट गटारात सोडण्यात आले आहे. मात्र नगरपंचायत प्रशासनाने संबंधीतांवर कोणतीच कार्यवाही केलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. www.konkantoday.com