
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना लांजा आराखडा, डम्पिंग ग्राउंड विरोधात आंदोलन करणार.
लांजा नगरपंचायतीच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या शहर प्रारुप विकास आराखडा (डीपीआर) विरोधात वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा तसेच कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड हद्दपार करण्यासाठी प्रथम लाक्षणिक उपोषण आणि त्यानंतर आंदोलन छेडण्याचा निर्णय लांजा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लांजा शहर कार्यकारणीची बैठक रविवारी शहरातील पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी लांजा शहर प्रारुप विकास आराखडा आणि कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड या दोन महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
नगरपंचायतीच्यावतीने कोंत्रेवाडी येथे लोकवस्ती लगत डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित असून त्याला येथील ग्रामस्थांनी ठाम विरोध केला आहे. डम्पिंग ग्राऊंडसाठी कोणताही अधिकृत शासकीय रस्ता नसतानाही प्रशासनाने जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ही कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे राहणार असून प्रथम या डम्पिंग ग्राऊंड प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पक्षाच्यावतीने ग्रामस्थांसोबत लाक्षणिक उपोषण आणि त्यानंतर आंदोलन छेडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.www.konkantoday.com