वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण!

मुंबई ते नवी मुंबई प्रवास केवळ १२ ते १५ मिनिटांत करणे अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूमुळे शक्य झाले आहे. हा सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन आज एक वर्षे पूर्ण झाले. मात्र या सागरी सेतूला अद्यापही वाहनचालक-प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. वर्षभरात अटल सेतूवरुन ८२ लाख ८१ हजार ५२४ वाहने धावली आहेत. दिवसाला ७० हजार वाहने या सागरी सेतूवरुन धावणे अपेक्षित असताना वर्षभरात दिवसाला सरासरी २२५०० वाहनांनी अटल सेतूवरून प्रवास केला आहे.

एमएमआरडीएकडून २१.८ किमीचा शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतू बांधण्यात आला आहे. मुंबई आणि नवी मुंबई शहरांना थेट जोडण्यासाठी आणि मुंबई महानगर प्रदेशाचा विकास साधण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला होता. सागरी सेतू डिसेंबर २०२३ मध्ये बांधून पूर्ण झाला आणि १२ जानेवारी २०२४ ला या सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर १३ जानेवारी २०२४ पासून सेतू वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यावेळी दिवसाला ७० हजार वाहने ये-जा करतील असा दावा करण्यात आला होता. मात्र या सेतूला वाहनचालक-प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने दिसते आहे. एक वर्षे झाले तरी अटल सेतूवरुन दिवसाला ७० हजारांऐवजी दिवसाला सरासरी २२५०० वाहने धावत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार १३ जानेवारी २०२४ ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत अटल सेतूवरुन एकूण ८२ लाख ८१ हजार ५२४ वाहने धावली आहेत.एका वर्षाच्या कालावधीत धावलेल्या एकूण ८२ लाख ८१ हजार ५२४ वाहनांमध्ये चारचाकी हलक्या वाहनांची संख्या सर्वाधिक, ७७ लाख ५ हजार ४९७ अशी आहे. मिनीबस, हलक्या व्यावसायिक वाहनांची संख्या ९९ हजार ३५६, बस, ट्रकची संख्या १ लाख १७ हजार ४१४,अवजड वाहनांची संख्या ८९८ तर उर्वरित वाहनांची संख्या ३ लाख ५८ हजार ३५९ अशी आहे. या वाहनांच्या माध्यमातून सेतू वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून आतापर्यंत नऊ कोटींहून अधिक रकमेची पथकर वसूली झाली आहे. वाहनसंख्या आणि पथकर वसूलीतून मिळालेला महसूल दोन्ही असमाधानकारक असल्याचे दिसते आहे.

अटल सेतूवरील भरमसाठ पथकर आणि वाशी पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांना देण्यात आलेली पथकर माफी यामुळे अटल सेतूकडे वाहनांचा कल कमी असल्याचे सांगितले जात आहे. वाहनांची संख्या वाढविण्यासाठी एमएमआरडीएने पथकर कमी करावा अशी मागणी सर्वसामान्यांची आहे. पण सागरी सेतूसाठी १७ हजार कोटींचा खर्च आला असून हा खर्च वसूल करण्यासाठी पथकर शुल्क आहे तसेच ठेवणे गरजेचे असल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button