
रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांच्या मालकांवर होणार फौजदारी, गुरांचाही करणार लिलाव
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर फिरणार्या मोकाट गुरांसंदर्भात रत्नागिरी नगर परिषद कारवाईचा बडगा उगारणार आहे. गुरे पकडून त्यांचा लिलाव केला जाणार आहे. गुरांच्या मालकांवरही फौजदारी कारवाई केली जाणार आहे. रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरे आढळून येत आहेत. रस्त्यांच्या मधोमध बसणे किंवा उभे राहत असल्याने काही वेळेला रस्त्यावरच झुंज लागत असल्याने वाहनधारकांसह पादचार्यांसह त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेने कडक भूमिका घेण्याचे धोरण अवलंबले आहे. रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी मोकाट गुरांसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांना केल्या आहेत. त्यानुसार दुहेरी कारवाईचे नियोजन केले जात आहे. पहिले काही दिवस गुरांचे मालक गुरांना त्यांच्या गोठ्यात घेऊन जातात की नाही हे पाहिले जाणार आहे. त्यानंतर गुरे पकडून त्यांचा लिलाव केला जाणार आहे.