
भूमिअभिलेख यंत्रणेचे काम होणार झटपट
रत्नागिरी : भूमिअभिलेख यंत्रणेचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी त्यांना जिल्हा नियोजन निधीतील नावीन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत नऊ तालुक्यांसाठी इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन उपलब्ध करून देण्यात आलेले असून त्यांचे वाटप जिल्हाधिकारी डॉक्टर बी. एन. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
भूमी अभिलेख विभागाअंतर्गत मोजणी कामाचा जलदगतीने निपटारा करणेवर भर दिला जाता आहे. हे काम अचूक व उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिपूर्ण व्हावे, या दृष्टीने रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी नावीन्य पूर्ण योजनेतून भूमी अभिलेख विभागासाठी 55 लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला असून त्यातून नऊ ई.टी.एस. मशिन घेण्यात आली. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते संबंधित तालुक्यातील अधिकार्यांना ई.टी.एस मशीनचे वाटप करण्यात आले.
यामुळे मोजणी कामी नवीन तंत्रज्ञान व साहित्य मिळाल्याने मोजणी कामाला गती मिळणार असून नऊ तालुक्यातील भूमी अभिलेखची कामे आता जलदगतीने होणार असल्याचे भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक एन. एन. पटेल यांनी सांगितले.
यावेळी सर्व तालुक्यातील उपअधीक्षक व कर्मचारी उपस्थित होते. हे मशीन प्राप्त करून घेण्यासाठी राज्याचे जमाबंदी आयुक्त एम. के. सुधांशु, अप्पर जमाबंदी आयुक्त श्री. रायते, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे व जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे पटेल यांनी सांगितले.