
भरणे उड्डाणपूल आणि जगबुडी नदी पुलावर खड्डे पडल्याने नाराजी
खेड : मुंबई – गोवा महामार्गारील भरणे येथील उड्डाण पूल आणि जगबुडी नदी पूल जंक्शन येथे पडलेले खड्डे हे धोकादायक ठरत आहेत. हे खड्डे बुजविण्यात आले नाही तर या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकदा येथे प्रत्यक्ष भेट देऊन या जंक्शनची पाहणी करावी, अशी मागणी वाहनचालक आणि प्रवासी यांनी केली आहे. भरणे नाका येथील उड्डाणपुलाचे काम तीन वर्षे रखडल्याने येथील व्यावसायिक, पादचारी, वाहनचालक, प्रवासी यांनी त्रास सहन केला आहे. येथे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेकांना लहानमोठ्या अपघातानाही सामोरे जावे लागले आहे. भरणे उड्डाण पूल वाहतुकीस खुला झाल्यावर येथील व्यावसायिक, प्रवासी, वाहन चालक यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पुलावरून एकेरी वाहतूक सुरु झाल्यावर दिलासा मिळण्याऐवजी डोकेदुखी वाढली आहे.