
देवरूखच्या कंडक्टरला रत्नागिरीत प्रवाशाकडून मारहाण; गुन्हा दाखल
रत्नागिरी : रत्नागिरी – देवरूख एसटीत दारूच्या नशेत असलेल्या प्रवाशाने वाहकाला मारहाण केली. ही घटना मंगळवार 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वा. सुमारास जयस्तंभ येथे घडली. याबाबत वाहक जयवंत जगन्नाथ मोहिते (वय 40, रा. देवरूख, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी प्रवाशाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी ते एसटी (एमएच-20-बीएल-3619) मधून रत्नागिरी ते देवरूख असे जात होते. ही एसटी जयस्तंभ येथे थांबली असता दारुच्या नशेत असलेला एक प्रवासी एसटीमध्ये चढला. एसटीमध्ये चढल्यानंतर वाहक मोहिते आणि त्या प्रवाशामध्ये बाचाबाची झाली. याचा राग आल्याने प्रवाशाने वाहकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर चालकाने ती एसटी शहर पोलिस ठाण्याच्या दिशेने वळवून तक्रार देण्यात आली.