
कोकणात गणपती सणासाठी आलेल्या चाकरमान्यांचे शुक्लकाष्ट संपेना, माणगांव येथे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकच्या कोंडीने चाकरमानी रखडले
कोकणातील महत्वाचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात आपापली वाहने घेवून दाखल झाले होते. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे चाकरमानी खडतर प्रवास करून गणेशोत्सवासाठी कोकणात पोहोचले होते. गणेशोत्सवाच्या आधी मंत्र्यांनी चाकरमान्यांना कोणतेही हाल सोसावे लागणार नाही व रस्त्याची डागडुजी केली जाईल असे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने त्याचा फटका चाकरमान्यांना बसला होता. त्यानंतर काल गणेश विसर्जन पार पडल्यानंतर चाकरमानी आज परतीच्या प्रवासाला लागले होते मात्र त्यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपलेले नाही. खड्ड्यांच्या त्रासाबरोबरच वाहतूक कोंडीचा फटका चाकरमान्यांना बसला.
पहाटे निघालेला चाकरमानी माणगांव येथे झालेल्या वाहतूक कोंडीत अडकले. जवळजवळ दोन तास वाहतूक कोंडीत अडकल्याने चाकरमानी हैराण झाले. त्यांच्याबरोबर असलेल्या महिला व मुले यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. त्यामुळे शासनाला कोकणाचे वावडे आहे की काय? असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे.www.konkantoday.com