
रिफायनरीला विरोध करणार्या तीन नेत्यांना पोलिसांच्या नोटीसा
राजापूर : रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणार्या आंदोलकांच्या सहा प्रमुख नेत्यांपैकी तिघांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. रिफायनरी विरोधी आंदोलनाच्या नेत्यांना तडीपार का करू नये? अशी विचारणा या नेत्यांना करण्यात आली आहे.
कोकणातील रिफायनरीविरोधातील आंदोलन मागील काही वर्षांपासून चर्चेत आहे. याच आंदोलकांच्या नेत्यांना आता तडीपार का केली जाऊ नये? अशी विचारणा करणारी नोटीस उपविभागीय पोलिस कार्यालयाने पाठवली आहे. त्याबाबत उत्तर देण्यासाठी या नेत्यांना 3 नोव्हेंबरपर्यंतची देखील तारीख देण्यात आली आहे. राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव येथे रिफायनरीसाठी चाचपणी केली जात आहे. पण, त्याचवेळी रिफायनरीविरोधी आंदोलनातील त्यांना नोटीस पाठवल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
दुसरीकडे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मात्र रिफायनरीबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं आहे. सामंत हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलकांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबससह अन्य एक प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात गेल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आता बजावण्यात आलेल्या नोटिसमुळे गेले काही महिने शांत असलेल्या रिफायनरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे .