
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सक्रिय-जिल्हाध्यक्ष सुरेश बने
रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सक्रिय मोडमध्ये आली आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्थानिक स्तरावर जोरदार तयारीला लागले असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पातळीवरील बैठका सुरू झाल्या आहेत.या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “प्रत्येक तालुक्यातून निवडणुकीपूर्व आढावा घेण्याचे काम सुरू आहे.
पक्षाचे कार्यकर्ते सज्ज आहेत. परिस्थिती पाहून आणि वेळ पडल्यास आम्ही या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे.”बने पुढे म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीनंतर आमच्यासमोर मोठा संघर्ष उभा राहिला होता, मात्र गेल्या काही महिन्यांत पक्षाची ताकद पुन्हा वाढत आहे. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. महाआघाडीचा धर्म आम्ही पाळत आहोत, परंतु युतीबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जाईल.”सुरेश बने यांनी स्पष्ट केले की, पक्षात प्रत्येक तालुक्यातून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांची छाननी पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत करण्यात येईल.बने यांनी विश्वास व्यक्त केला की, “रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया मजबूत आहे. आम्ही संघटन बळकट करण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्नशील आहोत. गावपातळीपासून जिल्ह्यापर्यंत पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता उत्साही आहे.”




