
*खेड न्यायालयातर्फे जागतिक सामाजिक न्याय दिन, ज्येष्ठ नागरिक कायदा विषयावर माहिती शिबीरे**राज्यघटनेनुसार समाजामध्ये सर्वांना रोजगार तसेच साधन संपत्तीमध्ये समान संधी- दिवाणी न्यायाधीश व. स्तर एन. एस. निसळ
रत्नागिरी, दि.3 : खेड तालुका विधी सेवा समितीतर्फे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश – १ डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहामध्ये जागतिक सामाजिक न्याय दिन, पालकांची देखभाल आणि कल्याण, ज्येष्ठ नागरिक कायदा व ज्येष्ठ नागरिकांसाठी इतर योजना या तीन विषयांवर मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्यात आलीत. कार्यक्रमास दिवाणी न्यायाधीश व. स्तर एन. एस. निसळ, सह दिवाणी न्यायाधीश क स्तर एस. एम. चव्हाण , २ रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर मनिषा म. पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. दिवाणी न्यायाधीश व. स्तर एन. एस. निसळ यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सामाजिक न्याय ही संकल्पना घटनेमध्ये असून, सामाजिक न्याय समाजातील सर्व घटकांना समान मिळावा, असे राज्यघटनेला अपेक्षित आहे. मतदानाचा हक्क, समान वेतनाचा हक्क हे सामाजिक न्यायच आहेत. सह दिवाणी न्यायाधीश क स्तर एस. एम. चव्हाण म्हणाले, ज्येष्ठ नागरिक कायद्याची सन २००७ साली निर्मिती झाली असून, नैसर्गिक, दत्तक, सावत्र आई-वडील, आजी-आजोबा हे पालक व ज्येष्ठ नागरिक या व्याख्येत येतात. त्यांची देखभाल करणे हे या कायद्याखाली येते. या कायद्याखाली वैद्यकीय गरजा, निर्वाह भत्ता मागता येतो. त्यासाठी प्रांताधिकारी यांची न्यायाधिकरण अध्यक्ष म्हणून नेमणूक असते. तेथे अर्ज करता येतो. हे न्यायाधिकरण रुपये १० हजार पर्यंत भत्ता देण्याबाबतचा आदेश करु शकतात. भत्ता दिला नाही तर वॉरंट काढले जावू शकते व कैदेची शिक्षा तसेच दंडाची शिक्षा अशी तरतूद या कायद्यात केलेली आहे. या कायद्यात वकिलांची नेमणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. २रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर खेड मनिषा म. पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे. त्यांचे राहणीमान सुसह्य व्हावे, आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी व अधिकार यांची जाणीव समाजाला आणि त्यांच्या पाल्यांना व्हावी म्हणून ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याण अधिनियम २००७ अंमलात आला. ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण पहाता त्यांच्यासाठी विविध योजना आणल्या गेल्या वृध्दाश्रम योजना, मातोश्री वृध्दाश्रम योजना, बस भाडयात सवलत, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृतीवेतन योजना आदींचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेवून त्यांचे आयुष्य सुखकर करावे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आबा निकम व सदस्य ओमप्रकाश लढ्ढा तसेच तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी के.एम.साळवी. एस. के. जोशी यांनी परिश्रम घेतले.www.konkantoday.com