
ये रे ये रे पावसा! रत्नागिरी जिल्ह्यात 81 गावांतील 158 वाड्यांना 16 टँकरने पाणी पुरवठा
रत्नागिरी : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता कायम राहिल्यामुळे विहिरी, पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. परिणामी टंचाईग्रस्त वाड्यांची संख्येत भर पडत आहे.
गत आठवड्यात 50 गावांना पाणी पुरवठा केला जात होता. आता मात्र 81 गावांतील 158 वाड्यांना 16 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक टंचाई संगमेश्वर, चिपळूण आणि खेड तालुक्यातील गावांना भासत आहे. आतापर्यंत टँकरच्या 1016 फेर्या झाल्या आहेत. दरम्यान येत्या दोन दिवसांत पाऊस पडला नाही तर टंचाईग्रस्त गावांचे शतक होणार आहे. मंगळवारी 10 गावांनी टँकरसाठी अर्ज प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होणार हे निश्चित आहे.
जिल्ह्यात गत आठवड्यात 51 गावांतील 110 वाड्यांना टँकरने पाणी पुरवावे लागत होते. मात्र चार दिवसातच यामध्ये वाढ झालेली दिसली आहे. मान्सून लाबल्याने ही वाढ जलद गतीने होताना दिसत आहे. काही गावात तर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे.