
कोल्हापूरच्या गुरूप्रसाद मोरे या शाळकरी मुलाने सिंधुदुर्ग समुद्रात बुधवारी 19 तास 23 मिनिटे अंखड पोहून वाहवा मिळवली
कोल्हापूरच्या गुरूप्रसाद मोरे या शाळकरी मुलाने सिंधुदुर्ग समुद्रात बुधवारी रात्री आणि गुरूवारी पहाटेपासून दुपारपर्यंत पोहण्याचा थरार केला.19 तास 23 मिनिटात न थांबता पोहून त्याने सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग किल्ला हे 97 कि.मी.चे अंतर पार केले. त्याच्या या विक्रमाची नोंद परफेक्ट बुक ऑफ वर्ल्डमध्ये करण्यात आली आहे. बुधवारी रात्री 9 वा. सिंधुदुर्ग किल्ल्यावरून त्याने समुद्रात उडी घेतली आणि तो विजयदुर्ग किल्ल्यावरील विजयदुर्ग जेटी येथे दुपारी 1 वा. पोहोचला. यावेळी विजयदुर्ग किल्ल्याजवळ सिंधुदुर्गातील स्थानिक लोकांनी आणि गुरूप्रसाद मोरे याच्या सहकार्यांनी एकच जल्लोष केला.प्रत्यक्षात सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग किल्ला हे समुद्रमार्गे अंतर 80 कि.मी. आहे. मात्र जीपीएस प्रणालीचा वापर केल्यामुळे व काही ठिकाणी अडथळे आल्यामुळे मार्ग काहीवेळा बदलावे लागले. त्यामुळे हा प्रवास 97 कि.मी. लांबीचा झाला. गुरूप्रसाद मोरे हा कोल्हापूर शहरातील दाभोळकर कॉर्नर येथे राहतो. कोल्हापूर येथीलच छत्रपती शाहू विद्यालयात तो आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. कोल्हापूरमधील जलतरण संघटनेचे अजय पाठक यांनी आपल्या सहकार्यांसमवेत विजयदुर्ग येथे यापूर्वी 5 कि.मी. जलतरण स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर 30 कि.मी. लांबीची जलतरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गुरूप्रसाद मोरेयाने तिसरा क्रमांक पटकावून मोठे यश मिळवले होते. याचवेळी त्याने सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग किल्ला हे अंतर समुद्रातून पोहून कापण्याचा मानस व्यक्त केला होता.