
श्यामची आई चित्रपटाचे चित्रिकरणाचा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ
कोरोनाचे संकट संपल्यानंतर आता चित्रपट सृष्टीनेही आघाडी घेतली आहे. गेल्या अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीला कोकणातील निसर्ग सौंदर्यासोबतच येथील ऐतिहासिक ठेव्याची भुरळ पडली आहे. अमृता राव निर्मित व सुजय डहाके दिग्दर्शित नव्या श्यामची आई चित्रपटाचे चित्रिकरण रत्नागिरी तालुक्यातील पावसनजिकच्या मावळंगे गावात सुरू झाले आहे. सोमवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते या चित्रिकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
शाळा, फुंतरू, आजोबा, केसरा असे एकापेक्षा एक प्रवाहापेक्षा वेगळा चित्रपट बनवणारे तरूण दिग्दर्शक सुजय डहाके हे पुन्हा एकदा नव्या आव्हानासह रसिकांच्या भेटीला आले आहेत. नेहमीच स्वतःसमोर वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट बनविण्याची आव्हानं उभी करीत ती यशस्वीपणे पार करणारे संजय डहाके हे आता इतिहासाची पानं उलगडण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत.
साने गुरूजींचा जन्म कोकणात झाला. त्यामुळे त्यांच्या मूळ पालगड गावातील तेव्हाचा असलेला वाडा मावळंगे गावात सापडला. नेने वाड्यात आता चित्रिकरण सुरू आहे. त्यामुळे तेव्हाच्या काळातील चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटात स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यात आले आहे. सुमारे ५० स्थानिक कलाकार असून त्यांना प्रथमच चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे. येथील मुलांमध्ये कलागुण आहेत. त्यांना संधी मिळण्यासाठी येेथे चित्रपटाचे चित्रिकरण वारंवार होणे आवश्यक आहे. त्यातून मुलांना कलागुणांना अधिक वाव मिळणार आहे. सुमारे एका वर्षाचा कालावधी चित्रपटाच्या निर्मितीला लागणार आहे. www.konkantoday.com