
कोंबड्यांची झुंज आयोजित करुन झुंजीवर सट्टा जुगाराचा खेळ खेळण्याकरीता जाहीरात केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल
कोंबड्यांची झुंज आयोजित करुन कोंबड्यांच्या झुंजीवर सट्टा जुगाराचा खेळ खेळण्याकरीता जाहीरात करुन त्याची प्रसिद्धी केल्याप्रकरणी एकूण आठ जणांवर कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद पोलीस संजय भगवान कदम (46) यांनी दिली. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 19 ऑक्टोंबर रोजी कुडाळ येथे कोंबडयांची झुंजी आयोजीत करून त्यावर सट्टा जुगार खेळला जाणार असचे व याची जाहीरात व्हॉटस्ॲप प्रसिद्ध झाल्याचे समजले. याबाबत श्री. कदम यांनी खात्री केल्यावर जियाद खान( रा. पिंगुळी -गोंधीयाळी ), साद शेख (रा. मज्जीद मोहल्ला, कुडाळ) यांनी ही कोंबडयांची झुंज आयोजित केल्याचे उघड झाले. यामध्ये अभिषेक नारायण काणेकर(रा. माणगांव, कट्टागाव), अरमान फैय्याज कर्णेकर(रा. कर्णेकर चाळ, कुडाळ), अंजार कुल्ली (रा. माणगांव), महेश साटेलकर (रा. मळेवाड- सावंतवाडी). श्री. गोसावी ( रा. मधली कुंभारवाडी, कुडाळ), जॉन इब्राहीम शेख(रा. मज्जीद मोहल्ला, कुडाळ) व एक अनोळखी इसम हे आपल्या कोंबडयांसहीत झुंजीत स्पर्धक म्हणुन सहभागी होणार होते. या झुंजीवर जुगाराचा सट्टा लावुन जुगार खेळवला जाणार होता.
या झुंजीला प्रेक्षकांना हजर राहण्यासाठी झुंजीचे कोंबड्यांसहीत स्पर्धकांचे छायाचित्र असलेली जाहीरात अनेकांच्या व्हॉटस् ॲपवर प्रसारीत करण्यात आली होती. आयोजक व स्पर्धक यांनी आपसी संगनमताने कोंबडयांच्या झुंजीवर सट्टा जुगाराचा खेळ खेळण्याकरीता जाहीरात करुन त्याची प्रसिद्धी केली म्हणून एकूण आठ आरोपी विरुद्ध कलम 12 (क) महाराष्ट्र जुगार अधिनियम सह कलम 3 (5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला,अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.




